पुणे

Weather Update : मिचाँग चक्रीवादळाने शास्त्रज्ञांनाही चकवले!

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अल निनो सक्रिय असल्याने डिसेंबरमध्येही किमान तापमान सामान्यपेक्षा 4 ते 5 अंशांनी जास्त राहणार असल्याचा अंदाज हवमान विभागाने दिला. मात्र, हा अंदाज मिचाँग चक्रीवादळाने चुकवला असून, तापमानात फारशी घट नसतानाही गार वार्‍यांमुळे राज्यातील बहुतांश भाग गेल्या दोन दिवसांपासून गारठला आहे. हवामान विभागाने 1 डिसेंबर रोजी देशातील किमान तापमान हे सरासरीपेक्षा 4 ते 5 अंशांनी जास्त राहणार असल्याचा अंदाज दिला. याला कारणही त्यांनी दिले.

सध्या अल निनो सक्रिय असल्याने त्याचा थंंडीवर परिणाम होणार असून, हिवाळ्यातील रात्री गरम असतील, असा अंदाज दिला. मात्र, या अंदाजानंतर दोनच दिवसांत वातावरण बदलले. बंगालच्या उपसागरात आलेल्या मिचाँग या चक्रीवादळाने दक्षिण भारतात प्रचंड पाऊस सुरू आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेशात पावसाने हाहाकार केला आहे. तिकडून येणारे बाष्पयुक्त वारे आणि उत्तरेत सक्रिय असलेला पश्चिमी चक्रवात यामुळे कश्मिरात सुरू असलेल्या बर्फवृष्टीने राज्यात थंडीची लाट आणली आहे.

मिचाँग वादळामुळे देशातील काही भागात मुसळधार पाऊस पडत असून, दक्षिणेत अजून जोर आहे. उर्वरित भागात तो कमी होत आहे. डोंगरावर झालेल्या बर्फवृष्टीमुळे तापमान शून्याच्या खाली गेले आहे. तर मैदानी राज्यातील जनता सध्या थंडीची वाट पाहात आहे. तेथेही लवकरच थंडी वाढण्याचे संकेत आहेत. काश्मीरमध्ये, खोर्‍यातील बहुतांश भागांत पारा शून्याच्या खाली गेला असून, त्यामुळे थंडीची तीव्रता वाढली आहे.

या भागात पावसाची शक्यता

ओडिशा आणि आंध्र प्रदेश तसेच तामिळनाडूच्या उत्तरेकडील किनारपट्टीच्या भागात समुद्राची स्थिती उग्र ते अत्यंत खराब आहे. समुद्र चक्रीवादळामुळे खवळलेला असून, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, दक्षिण बिहार आणि गंगेच्या पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते मध्यम पाऊस पडू शकतो. पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ, पूर्व तेलंगणा, आंध्र प्रदेशचा उत्तर किनारा आणि अंदमान निकोबार बेटांवर हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, मराठवाडा, पूर्व उत्तरप्रदेशातही हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

उत्तर -दक्षिणेकडून राज्यात गार वारे

राज्यात दक्षिणेकडून बाष्पयुक्तवार्‍यांचा प्रभाव वाढला आहे, तर उत्तर भारतातून पश्चिमी चक्रवातामुळे शीतलहरी सक्रिय झाल्याने राज्यावर या दोन्ही परिस्थितीचा परिणाम झाला आहे. ईशान्य मान्सून हंगामात जेव्हा जेव्हा बंगालच्या उपसागरात वादळ येते तेव्हा आपण सामान्यतः पाहतो की ईशान्य मान्सूनचा पॅटर्न विस्कळीत होतो आणि पूर्ववत होण्यास वेळ लागतो. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मिचाँग चक्रीवादळाने काल आंध्र किनारपट्टी ओलांडल्याने हा प्रकार घडला आहे. यासोबतच आंध— किनारपट्टी तसेच तामिळनाडूच्या काही भागांत आणि तेलंगणातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढला आहे.

मध्यमहाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता

मिचाँग चक्रीवादळ पूर्ण शमले असून त्याचे आता कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर झाले असले तरीही समुद्र खवळलेला आहे. त्यामुळे दक्षिण किनारपट्टीवर 9 डिसेंबरपर्यंत पाऊस सुरूच राहणार आहे. त्याचा प्रभाव राज्यावर दिसणार असून मध्यमहाराष्ट्र व मराठवाडा भागात आगामी तीन दिवस हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. दाट धुके, हलका पाऊस अन् थंडी असे वातावरण अजून दोन ते तीन दिवस राहणार आहे.

हवामान विभाग दोन प्रकारे अंदाज देते. यात लाँगरेंज फोरकास्ट आणि शॉर्टरेंज फोरकास्ट असे दोन अंदाज असतात. 1 डिसेंबर रोजी दिलेला अंदाज हा डिसेंबर ते फेब—ुवारीचा आहे. यात आठवड्याची परिस्थिती वेगळी असू शकते. मागच्या आठवड्यात थंडी नव्हती पण या आठवड्यात चक्रीवादळामुळे परिस्थिती बदलली आहे. राज्यात अजून थंडी वाढेल व याची सुरुवात झाली आहे.
-डॉ. कृष्णानंद होसाळीकर,अतिरिक्त महासंचालक, पुणे हवामान विभाग.

पुणेकरांना थंडी अनुभवायला मिळणार

पुणे हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की, चक्रीवादळ शमले आहे. त्याचा परिणाम आता कमी होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानात एक ते दीड अंशांनी घट झाली आहे. आगामी आठवड्यात त्यात आणखी घट होऊन पुणेकर ज्या थंडीची वाट पाहात आहेत. ती अनुभवायला मिळणार आहे. हीच परिस्थिती राज्यातील बहुतांश भागांत पाहावयास मिळेल.

महाबळेश्वर गारठू लागले पारा 13.6 अंशांवर

गुरुवारी सायंकाळी राज्यात महाबळेश्वरचा पारा राज्यात सर्वांत कमी 13.6 अंशांवर खाली आला होता. त्यामुळे राज्य गारठण्यास सुरुवात झाली असून, 8 डिसेंबरपासून राज्यात थंडीचा कडाका जाणवू लागेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने दिला आहे.

राज्याचे गुरुवारचे तापमान..

मुंबई 23.5, रत्नागिरी 23, पुणे 15.7, लोहगाव 16.4, अहमदनगर 16.3, जळगाव 17.4, कोल्हापूर 19.9,महाबळेश्वर 13.6, मालेगाव 18.6, नाशिक 16.8, सांगली 18.8, सातारा 17.2, सोलापूर 19.2, छत्रपती संभाजीनगर 18, परभणी 19.3, नांदेड18.8, बीड18.2, अकोला 19.7, अमरावती 17.7, बुलढाणा 18.4, ब—ह्मपुरी 18.6, चंद्रपूर 17.0, गोंदिया 17.6, नागपूर 18.6, यवतमाळ 18.0.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT