Weather Impact On Farmers Pudhari
पुणे

Weather Impact On Farmers: बदलत्या हवामानाचा शेतीवर घाला; द्राक्ष, कांदा, मुळा, ज्वारी उत्पादक अडचणीत

भावघसरण, रोगराई व वाढता उत्पादनखर्च; पुणे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात

पुढारी वृत्तसेवा

जंक्शन: या वर्षीचा द्राक्ष माल तोडणी हंगाम सुरू झाला आहे. मात्र, सध्या वातावरणातील बदलामुळे द्राक्षांचे दर कमी होत आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे द्राक्ष बागेतील माल काडी परिपक्व झाली नाही. त्यामुळे या वर्षी बऱ्याच बागेत कमी अधिक प्रमाणात घडांची निर्मिती झाली आहे. तसेच, वातावरणात वारंवार बदल होत असल्यामुळे जास्त प्रमाणात औषधांची करावी लागत आहे. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात थंडी जास्त प्रमाणात असल्याने बागेवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन खर्च वाढला आहे. डिसेंबर 2025 महिन्यात निर्यातक्षम द्राक्षास 180 रुपये प्रतिकिलो भाव मिळत होता. स्थानिक रेटदेखील 150 रुपये होते. मात्र, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात द्राक्षास 110 ते 120 रुपये दर मिळत आहे. रासायनिक खतांचे व रासायनिक औषधांच्या किमती वाढल्या असून, द्राक्षाचे दर कमी झाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडणार आहे. विविध मोबाईल ग््रुापच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी दराने द्राक्ष विकू नये, असा सल्ला दिला जात आहे. व्यापारी वातावरणातील बदलाचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांकडील द्राक्षाची कमी दराने मागणी करून किमती पडत असल्याचे जाणकार शेतकऱ्यांनी सांगितले.

पारगाव: आंबेगाव तालुक्यात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर मुळ्याची लागवड करण्यात आली होती. कमी कालावधीत तयार होणारे पीक आणि नियमित बाजारपेठ मिळेल, या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी मुळ्याची शेती केली. मात्र, सध्या प्रतिकूल हवामान आणि बाजारभावातील घसरण यामुळे मुळा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात तीव थंडी जाणवत आहे. या वाढलेल्या थंडीचा थेट परिणाम मुळ्याच्या पिकावर झाला आहे. थंडीमुळे मुळ्यांना अकाली फुले येण्याचे प्रमाण वाढले असून, त्यामुळे जमिनीत वाढणाऱ्या मुळ्यांची पोषण प्रक्रिया नीट झाली नाही. परिणामी, मुळे अपेक्षित आकाराची व वजनाची न राहता पोकळ, कडू चवीची आणि बाजारात कमी दर्जाची ठरत आहेत.

याच काळात बाजारपेठेत मुळ्याला मिळणारा दरही अत्यंत कमी आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळणारा भाव तोकडा असल्याने शेतकऱ्यांचा खर्चही निघणे कठीण झाले आहे. बियाणे, खते, औषधे, मजुरी आणि पाणीपुरवठा यासाठी केलेला खर्च वसूल न झाल्याने शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण आहे, असे शिंगवे गावातील मुळा उत्पादक शेतकरी अमोल शेळके यांनी सांगितले.

काही शेतकऱ्यांनी मुळा काढणी करून बाजारात नेला असता व्यापाऱ्यांकडून अत्यल्प दरातच खरेदी केली जात असल्याचे चित्र आहे. तर, काही ठिकाणी मागणीअभावी मुळा शेतातच राहून खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान अधिकच वाढत आहे.

महाळुंगे पडवळ: आंबेगाव तालुक्यात सततच्या ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकावर मावा व करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे महागडी औषधे फवारणी करावी लागत आहेत. परिणामी, उत्पादनखर्चात वाढ होत असल्याने शेतकरीवर्गातून चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. डिंभे धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या अनेक गावांमध्ये बारमाही पाणी उपलब्ध असल्याने आंबेगाव तालुक्यात सुमारे सहा हजार हेक्टर कांदा लागवड झाली आहे. अधिक पैसा मिळवून देणारे नगदी पीक म्हणूनही शेतकरी कांद्याकडे आकृष्ट होत आहेत. मागील वर्षाची तुलना करता इतर काही वर्षांत कांदापिकाचे पैसे झाले. पण, मागील वर्षी शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा तोटाही सहन करावा लागला आहे.

आता सततच्या ढगाळ वातावरणामुळे कांद्यावर मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. कृषी विक्रेते शेतकऱ्यांना विविध कंपन्यांची औषधे वाढीव किमतीवर विकत असल्याने शेतकऱ्यांना नाहक खर्च करावा लागत आहे. योग्य औषधांच्या नियोजनासाठी कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

यंदा कांदा लागवडीसाठी रोपांची टंचाई मोठ्या प्रमाणात होती. लागवडीसाठी मजूर मिळत नव्हते. शेतकऱ्यांनी भांडवली खर्च करून कांदा लागवडी पूर्ण केल्या आहेत. रासायनिक खतांची वाढलेली किंमत वातावरणातील बदलांमुळे पिकावर येणारे रोग, यामुळे शेतकऱ्याला कांदा पीक घेणे मुश्कील होत आहे. केंद्र व राज्य शासनाचे निर्यात धोरण निश्चित नसल्याने कांद्याचे भाव सद्य:स्थितीला दोनशे रुपये प्रतिदहा किलो आहेत. विक्रीयोग्य कांदा उत्पादन मार्चनंतर मोठ्या प्रमाणात होणार आहे. काढणीला आलेला कांदा बाजारात विक्रीसाठी आला तर भाव कोसळतील, असे अडतदार सांगत आहेत.

लोणी-धामणी: आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लाखणगाव, जारकरवाडी, पोंदेवाडी, देवगाव, काठापूर बुद्रुक, निरगुडसर, वाळुंजनगर आदी गावांमध्ये सध्या फ्लॉवरतोडणीचे काम जोरात सुरू आहे. मात्र, फ्लॉवरच्या बाजारभावात मोठी घसरण झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

फ्लॉवर लागवडीनंतर साधारण सव्वा महिन्यात तोडणीला येतो. पीक जोमात असल्यास साधारण 7 ते 8 तोडे मिळतात. मात्र, लागवडीपासून तोडणीपर्यंत मोठ्या प्रमाणात खर्च होतो. त्यामुळे बाजारात फ्लॉवरला योग्य भाव न मिळाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. सध्या फ्लॉवरला 10 किलोमागे केवळ 100 ते 125 रुपये इतकाच बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

कांदा, बटाटा यांच्यासह इतर भाजीपाला पिकांचेही भाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतात प्रचंड मेहनत करून पिकवलेल्या मालाला जर योग्य बाजारभाव मिळत नसेल, तर शेती करण्यापेक्षा न करणेच बरे, अशी शेतकऱ्यांची मानसिकता आहे. उत्पादनखर्चही वसूल होत नसेल तर शेतकऱ्यांनी करायचे काय? असा प्रश्नही त्यांनी केला आहे.

वाल्हे: वाल्हे (ता. पुरंदर) परिसरामध्ये रब्बी हंगामातील ज्वारीचे पीक सतत बदलणाऱ्या हवामानामुळे धोक्यात आले आहे. या पिकांवर मोठ्या प्रमाणावर चिकटा, तांबेरा, करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे यावर्षी ज्वारीच्या उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे. यावर्षी खरीप हंगामाच्या आगोदरच मे महिन्यात पुरंदर तालुक्यात समाधानकारक पाऊस पडला होता. तसेच परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणावर या परिसरात झाला होता. त्यामुळे वाल्हे व परिसरात ओढे-नाले मागील महिन्यांपर्यंत वाहत होते. यामुळे यावर्षी पिकांना पाणी देण्यासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याने या परिसरात ज्वारीचे पीक चांगले आले आहे.

दरम्यान महिन्यांपासून दिवसेंदिवस वातावरणात बदल होत आहे. याचा परिणाम शेतातील विविध पिकांवर होत असल्याने शेतकरीवर्ग चिंताग््रास्त होत आहेत. बदलत्या हवामानामुळे ज्वारीचे पीक विविध रोगांना बळी पडत आहे. चिकटा, तांबेरा, मावा, करपा आदी रोगराई विविध पिकांवर पडत आहे. त्यामुळे पानगळ होत असून कमी प्रमाणात दाणे भरणे, तर पिकेही लोळू लागल्याचे दिसत आहे. तसेच ज्वारीच्या पानावर विविध रोग पडत असल्याने, पांढराशुभ असलेला कडबा विविध रोगाच्या प्रादुर्भावाने काळा पडत आहे. यामुळे शेतकरीवर्ग चिंतेत आहे. दुसरीकडे डोंगरी परीसरात जे पीक दिसत आहे तेथेही रानडुकरांचा उपद्रव वाढला असल्याने याचाही फटका बसत आहे. 8पान 2 वर

त्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहेत. मागील दोन-तीन वर्षांपासून पुरंदर तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती होती. तालुक्यात अनेक भागांत टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. तालुक्याच्या अनेक भागांमध्ये पशुधन जगविण्यासाठी चारा छावण्या उभारल्या होत्या. यामुळे मागील वर्षी शेतकरीवर्गाच्या दावणीचे पशुधन टिकले. आता मात्र मुबलक पाणी असूनही बदलत्या वातावरणाचा पिकांवर विविध रोग पडू लागले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT