सुविधा नाही; पण पाणी तरी द्या! समाविष्ट गावांतील नागरिकांची फरपट Pudhari
पुणे

Pune News: सुविधा नाही; पण पाणी तरी द्या! समाविष्ट गावांतील नागरिकांची फरपट

कर भरूनही मिळेनात पायाभूत सुविधा

पुढारी वृत्तसेवा

निनाद देशमुख

पुणे: पुणे महानगरपालिकेत समाविष्ट 34 गावांतील विकासकामांना गती मिळताना दिसत नाही. येथील नागरिकांनी गेल्या वर्षी तब्बल 700 कोटींपेक्षा अधिक करभरणा केला आहे. यंदा मे महिन्यात 30 कोटींचा कर स्वतःहून भरला. ‘आम्ही कर भरतो त्या तुलनेत पायाभूत सुविधा आम्हाला अजिबात मिळत नाहीत, तर किमान पाणी तरी द्या,’ अशी आर्त मागणी या गावातील नागरिकांनी केली आहे.

2021 पर्यंत टप्प्याटप्प्यांनी 34 गावांचा पुणे महानगरपालिकेत नव्याने समावेश झाला आहे. या समाविष्ट गावांमध्ये यातील दोन गावांमध्ये नगरपरिषद झाल्याने नुकतीच ती गावे महानगरपालिकेतून बाहेर पडली. इतक्या वर्षांमध्ये उर्वरित 32 गावांचा विकास आराखडा देखील व्यवस्थित तयार झालेला नाही. (Latest Pune News)

रस्ते, पाणी, ड्रेनेजलाइन, पाण्याचा निचरा, कचरा व्यवस्थापना सारख्या अनेक बाबींचा अभाव या 34 गावांमध्ये आहे. त्यामुळे ‘आमची ग्रामपंचायत बरी’ म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. महानगरपालिकेत 34 गावे समाविष्ट होण्यापूर्वी पुणे महानगर क्षेत्र प्राधिकरणाने बांधकामास अनुमती देताना बांधकाम व्यावसायिकांनी सोसायट्यांना टँकर उपलब्ध करून द्यावे, अशी अट घातली होती.

मात्र, ही गावे महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर बांधकाम व्यावसायिकांनी पाणीपुरवठा करण्याचे दायित्व महापालिकेवर टाकले आणि सोसायट्यांचा बिल्डरकडून होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. 23 गावांतील करवसुलीस स्थगिती देण्यात आली असली, तरी पालिकेच्या कर विभागामार्फत नागरिकांच्या नावे बिले तयार करण्यात आली आहेत.

बर्‍याच नागरिकांनी ही बिले स्वत:हून भरली आहेत. 2023-2024 या वर्षात 700 कोटींपेक्षा अधिक, तर या वर्षी मे महिन्यापर्यंत 30 कोटींचा कर नागरिकांनी भरला आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा नाही, तर किमान पाणी तरी पालिकेने द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

पाण्यासाठी सोसायट्यांना दरमहा दोन लाखांचा भुर्दंड

महापालिकेची पाणीपुरवठा विभागाची यंत्रणा या गावांमध्ये अस्तित्वात नाही. त्यामुळे साधारण 100 फ्लॅट असलेल्या सोसायटीला दिवसाकाठी 7 ते 8 टँकर लागतात. एका टँकरसाठी 1 हजार ते 12 रुपये मोजावे लागतात. त्यामुळे सोसायट्यांना केवळ पाण्यासाठी दरमहा दीड ते दोन लाख रुपये मोजावे लागत आहेत.

महापालिकेला पाणीपट्टीपोटी 6 कोटी जमा

नागरिकांनी भरलेल्या करातून पालिकेच्या पाणीपुरवठा विभागला पाणीपट्टीचे 6 कोटी रुपये मिळाले आहेत. कर भरूनही पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे पालिकेने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

आम्हाला रोज 5 ते 6 टँकर लागतात. यासाठी आम्हाला दिवसाला एका टँकरमागे 900 रुपये द्यावे लागतात. उन्हाळ्यात हीच संख्या 7 ते 8 टँकरवर जाते तसेच टँकरचे दर देखील 100 ते 200 रुपयांनी वाढतात. त्यामुळे महिन्याला एक लाखापर्यंत आम्हाला खर्च येतो. महापालिकेत येऊन दोन वर्षे होऊनसुद्धा आम्हाला पाणी मिळालेले नाही.
- अनुप नाईक, सेक्रेटरी, एस थ्री प्राइम सोसायटी, सूस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT