खडकवासला: भोर विधानसभा मतदारसंघातील भोर-राजगड-मुळशी तालुक्यातील जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता, निकृष्ट दर्जा आणि कामे अपूर्ण राहिल्याचा आरोप करत, या सर्व कामांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आमदार शंकर मांडेकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्याकडे लेखी निवेदन दिले आहे.
आमदार मांडेकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, मतदारसंघात जल जीवन मिशनअंतर्गत शेकडो पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या आहेत. यापैकी काही योजना पूर्ण झाल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले असले तरी, प्रत्यक्षात अनेक गावांमध्ये नागरिकांना पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. अनेक ठिकाणी कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. काही ठिकाणी कामे पूर्ण न होताच ठेकेदारांना जादा बिलांचे देयक अदा केले आहे. कामांचा दर्जा निकृष्ट असून, प्रशासकीय नियमांचे उल्लंघन झाल्याचेही निदर्शनास आले आहे. यामुळे शासनाचा निधी वाया जात असून, नागरिकांना शुद्ध पाणी मिळण्याच्या योजनेला खीळ बसली आहे, असे मांडेकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.
आमदार मांडेकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ग््राामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे भोर विधानसभेतील सर्व जल जीवन मिशन योजनांची सखोल चौकशी व्हावी.
याप्रकरणी उद्यापासून होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करुन राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री यांच्याकडे जल जीवन मिशनच्या या कामांची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
आमदारांनी केल्या या मागण्या
अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश द्यावेत.
निकृष्ट आणि अनियमित कामांवर ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करावी.
जादा देयक अदा करणे किंवा अनियमितता सिद्ध झाल्यास संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.