पुणे

पुण्यातील ‘पाणी बंद’चा निर्णय अधिकार्‍यांच्या अंगलट

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पाणीकपात रद्दची घोषणा केल्यानंतर अवघ्या आठवडाभरात लगेचच येत्या गुरुवारी पाणी बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका अधिकार्‍यांच्या चांगलाच अंगलट आला आहे. या निर्णयावरून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकार्‍यांना फैलावर घेतल्यानंतर प्रशासनाने घाईघाईने येत्या गुरुवारचा 'पाणी बंद'चा निर्णय सायंकाळी मागे घेतला. अल निनोच्या प्रभावामुळे यंदा मान्सून लांबण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेने मे महिन्यापासून दर गुरुवारी पाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. जुलैअखेरपर्यंत ही पाणीकपात सुरू होती. मात्र, महिनाअखेरीस झालेल्या पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे 60 टक्क्यांपेक्षा अधिक भरल्यानंतर गत आठवड्यापासून ही पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय पालकमंत्री पाटील यांनी घेतला.

मात्र, त्यानंतर लगेचच म्हणजे येत्या गुरुवारी पाणीपुरवठा केंद्रातील दुरुस्तीच्या कारणास्तव शहराचे पाणी बंद ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेण्यात आला. यासंबंधीची प्रेसनोटही प्रशासनाकडून देण्यात आली. मात्र, कपात रद्द करण्याच्या घोषणेनंतर लगेचच पुन्हा गुरुवारी पाणी बंद ठेवण्याच्या निर्णयावर सोशल मीडियावर जोरदार टीका झाली. त्यावर पालकमंत्र्यांनी माहिती घेतली असता महावितरणच्या सूचनेनुसार हा बंद ठेवण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

महावितरणने मात्र दुरुस्तीची कुठलीही घाई नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे नक्की कोणत्या कारणास्तव 'पाणी बंद'चा निर्णय झाला? असा प्रश्न उपस्थित झाला. याबाबत पालकमंत्र्यांनी थेट आयुक्त विक्रम कुमार यांनाच विचारणा केली. याबाबत आयुक्तही अनभिज्ञ असल्याचे समोर आले. आयुक्तांनी याबाबत पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुध्द पावसकर यांना थेट 'कारणे दाखवा' नोटीस बजावली. या सगळ्या घडामोडींनंतर सायंकाळी पाणीपुरवठा विभागाने गुरुवारी शहराचा पाणीपुरवठा सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे 'पाणी बंद'नंतर पुढील दोन दिवस अपुर्‍या दाबाच्या पाणीपुरवठ्याच्या त्रासातून पुणेकरांची सुटका झाली.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT