अर्जुन खोपडे
भोर: निरा देवघर, भाटघर धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने धरणातील विहिरींचे पाणी कमी झाले आहे. याचा फटका वारवंड गावाला बसला आहे. गावात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीने टँकर मागणीचा प्रस्ताव पंचायत समितीकडे दिला आहे. मात्र, अद्याप टँकर सुरू झालेला नाही.
वारवंड गावाची लोकसंख्या 230 असून, गावात 110 पाळीव जनावरे आहेत. दरवर्षी 15 एप्रिलनंतर पाण्याची टंचाई जाणवते. निरा देवघर धरणाच्या पात्रात विहीर काढून वारवंड गावाला नळ पाणीपुरवठा योजना केली होती. परंतु, सध्या निरा देवघर धरणात 24 टक्के पाणीसाठा शिल्लक असून, पॉवर हाऊसमधून 750 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
धरणातील पाण्याची पातळी खालावल्याने धरण क्षेत्रातील गावांना पाणीपुरवठा करणार्या विहिरीतील पाणीपातळी कमी झाली आहे. वारवंड गावाला पाणीपुरवठा करणार्या विहिरीने तळ गाठला आहे. पाणीपुरवठा करणारी विद्युत मोटार उघडी पडली आहे. मागील आठवडाभरापासून भोर-महाड रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठेकेदाराला ग्रामस्थांनी विनंती केल्याने दररोज दहा हजार लिटर पाणी टँकरने विहिरीत सोडले जात आहे.
दरम्यान, जवळपास दोन ते अडीच महिने वारवंड ग्रामस्थांना पाण्याची टंचाई भासणार आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने टँकर सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. हिर्डोशी भागातील रिंग रोडवरील व भोर-महाड रस्त्यावरील पन्हर बुद्रुक व वाड्या वस्त्या, शिळिंब, राजीवडी, उंबर्डे, वारवंड, कुडली खुर्द, शिरवली हिमा या गावांचे गेल्या वर्षी टँकरचे प्रस्ताव मार्च महिन्यात मंजुरीसाठी आले होते. यावर्षी यातील वारवंड गावचाच प्रस्ताव पंचायत समितीकडे आला आहे.
जयतपाड गावची लोकसंख्या 817 असून, गावासाठी जलजीवन मिशनअंर्तगत 2023 साली जयतपाडमधील गावठाण हुंबेवस्ती रांजणवाडी, विचारेवाडी, निवंगणी यांच्यासाठी सुमारे एक कोटी 9 लाख रुपये योजना मंजूर आहे. मात्र, यातील पाणीपुरवठा विहीर पंपिंग मशिन बसवल्या आहेत. तर पाइपलाइनचे काम अर्थवट अवस्थेत आहे. कामाची मुदत 2024 साली संपूनही अद्याप योजनेचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे गावात पाणीटंचाई वाढली असून, हुंबेवस्ती येथील नागरिक सध्या दोन किलोमीटरवर असलेल्या विचारेवाडी येथील जुन्या पाइपलाइनवरून महिला डोक्यावरून पाणी आणत आहेत.
हुंबेवस्तीसाठी टँकर मागणीचा प्रस्ताव भोर पंचायत समितीला दिला आहे. टँकर मंजूर होईपर्यंत संबंधित ठेकेदाराने खासगी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी सरपंच सुजाता दिघे यांनी केली आहे. दरम्यान, कामाची मुदत संपल्यावर काम पूर्ण न झाल्याने संबंधित ठेकेदाराला काम पूर्ण करण्याबाबत पाणीपुरवठा विभागाने नोटीस दिल्याचे नळ पाणीपुरवठा विभागाने सांगितले.
हुंबे वस्तीतील महिलांची पायपीट
वेळवंड खोर्यातील जयतपाइ येथील जलजीवन मिशन योजनेंर्तगत मंजूर नळ पाणीपुरवठा योजनेचे काम रखडल्याने हुंबेवस्ती येथील नागरिकांना मागील दहा दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे महिलांना सुमारे दोन किलोमीटरवर असलेल्या विचारेवाडी येथून डोक्यावरून उन्हात पाणी आणावे लागत आहे.