येरवडा: संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छ अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी परिसरातील सर्व स्वच्छतागृहे सफाईची कामे सुरू आहेत. यानिमित्त येरवडा येथील ठाकरे चौक या ठिकाणी असणार्या स्वच्छतागृहांची सफाई येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने करण्यात आली असली, तरी ही सफाई निव्वळ दिखाव्यासाठी, फोटो काढण्यासाठी केली असल्याचे स्पष्ट दिसत आहे. आज या स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था झाल्याचे दिसत असून, शासनाच्या स्वच्छता अभियानाचा फज्जा उडाल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
येरवडा परिसरात एकूण 65 स्वच्छतागृहे आहेत. स्वच्छ पुणे अभियानांतर्गत मुख्य खात्याकडून या सर्व स्वच्छतागृहांचे सर्वेक्षण करून येथील दोन स्वच्छतागृहांची निवड करण्यात आली. हॉट मिक्स प्लॅा येथील स्वच्छतागृह बंद असल्याने ठाकरे चौकातील स्वच्छतागृह सर्वेक्षणासाठी घेण्यात आले. फोटो काढण्यापुरते हे स्वच्छतागृह चकाचक करण्यात आले.
तात्पुरत्या स्वरूपात मॅट, सुंगधी द्रव्ये टाकण्यात आली. येथील वॉशबेसिनवर हँडवॉश आणि डेटॉल ठेवण्यात आले. एक नवा आरसा बसवण्यात आला. फोटो काढण्यापुरते काम करणार्या कर्मचार्यांसाठी हॅन्ड ग्लोज आणि स्वच्छ कपडे देण्यात आले. फोटोसेशन झाल्यानंतर येथील आरोग्य आधिकारी येऊन गेल्यानंतर येथील सर्व वस्तू गायब करण्यात आल्या, त्यामुळे पुन्हा या स्वच्छतागृहात सर्वत्र घाण असल्याचे दिसून येत आहे.
हे स्वच्छतागृह नेहमी अस्वच्छ असल्याचे पाहायला मिळते. आरोग्य विभाग जाणीवपूर्वक याकडे लक्ष देत नाही. स्वच्छतागृह अस्वच्छ असल्याने याचा वापरही होत नाही, एक तर हे स्वच्छतागृह स्वच्छ तरी करावे; अन्यथा कायमचे बंद करण्यात यावे.
- अनवर पठाण, सामाजिक कार्यकर्ते