

उरुळीकांचन: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पेहलगावजवळ बायसरन गार्डनमध्ये मंगळवारी (दि.२२) झालेल्या भ्याड दहशतवादी हल्यात २७ देशवासियांचा बळी गेल्यानंतर या पर्यटनस्थळी दहा मिनिटांत पोहोचण्याच्या तयारीत असलेल्या उरुळीकांचन तसेच दौंड व शिरुर मधील ७० पर्यटकांचा जीव वाचला आहे. घटनास्थळी पोहोचण्यास दहा मिनिटांचा उशीर झाल्याने या ७० पर्यटकांचा जीव थोडक्यात बचावला आहे.
उरुळीकांचन स्थित मेलडी टूर्स अँड ट्रॅव्हल्सकडून सुमारे ७० प्रवासी या पर्यटनस्थळी जाणारे होते. त्यापूर्वीच घटना घडल्याने हे पर्यटक माघारी फिरले. दरम्यान या पर्यटकांनी शिरुर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटकेंशी संपर्क साधला असून कटके यांनी त्यांच्या परतीसाठी विमानाची व्यवस्था करणार असल्याची माहिती दिली आहे.
उरुळीकांचन येथील मेलडी टूर्स व ट्रॅव्हल्सकडून आयोजित जम्मू काश्मीरच्या सहलीसाठी उरुळीकांचन, आळंदी म्हातोबा व परिसर तसेच दौंड व शिरुर तालुक्यातील एकूण ७० लोक हे १५ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरला रवाना झाले होते. ते हल्ल्याचे घटनास्थळ बायसरन गार्डनला मंगळवारीच भेट देणार होते. परंतु ते घटनास्थळावरुन अगदी एक किलोमीटर जवळील बायसरन पहाडीतून प्रवास करुन पर्यटनस्थळी पोहचण्यापूर्वीच हा हल्ला झाला.
या पर्यटकांना लष्कराने पुढे न जात माघारी परत जाण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्यांनी पेहलगामध्येच एका हॉटेलमध्ये मिळेल त्या ठिकाणी संपूर्ण रात्र काढली आणि सकाळी त्यातीलच एका पर्यटकाने व्हिडीओ स्वरुपात राज्य सरकारला मदत मागितल्यानंतर या अडकलेल्या प्रवाश्यांबद्दल माहिती प्राप्त झाली.
या अडकलेल्या पर्यटकांचा व्हिडीओ समोर आल्यानंतर शिरुर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच खासदार सुनिल तटकरे यांच्याशी संपर्क साधून अडकलेल्या पर्यटकांना सोडविण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत.
या पर्यटकांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारशी संपर्क साधण्याची कार्यवाही सुरू आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आल्याने श्रीनगर भागातील वाहतूक ठप्प झाली आहे. बुधवार सकाळी हे पर्यटक कश्मीर पर्यंत पोहचले आहेत. त्यांनी स्थानिक प्रशासनाला मदतीची मागणी केली आहे.
हवेली, दौंड व शिरुर मधील अडकलेल्या पर्यटकांशी संपर्क सुरू आहे. हे सर्व पर्यटक सुखरूप असून त्यांना कश्मीर अथवा जम्मू मार्गे परतीसाठी प्रयत्न सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार , खासदार सुनील तटकरे यांच्याशी संपूर्ण सुरू आहे लवकरच त्यांना विमानाने पुण्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये.
- आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके
दहशतवादी हल्ल्यावेळी आम्ही बायसरन घाटातून प्रवासकरुन हल्ला झालेल्या ठिकाणी जाणार होतो. परंतु या ठिकाणी जाण्याच्या दहा मिनिटे पूर्वी घटना घडल्याने आम्हाला या ठिकाणी जाण्यास मज्जाव केला. त्यामुळे आम्ही संपूर्ण रात्र पेहलगाम येथे काढली आहे. आम्ही सर्व ७० जण असून आम्ही मदतीची मागणी केली आहे. स्थानिक प्रशासन आमच्या पर्यंत पोहचले असून मदत मिळेल अशी अपेक्षा आहे.
-ज्योती झुरंगे , मेलडी टूर्स अँन्ड ट्रॅव्हल , उरुळीकांचन