पुणे

पाणी टंचाईचे सावट : पाण्यासाठी टँकरभोवती झुंबड

Laxman Dhenge

पेठ : पुढारी वृत्तसेवा : सातगाव पठार भागातील थुगाव, भावडी व पारगाव तर्फे खेड या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने शासनाने टँकर सुरू केले आहेत. मात्र, गावात टँकर येताच पाणी घेण्यासाठी नागरिकांची चांगलीच झुंबड उडत आहे. अनेकदा वादविवादाचे प्रसंगदेखील घडत आहेत. सध्याचे टँकर कमी पडत असून, त्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे.
भावडी हद्दीतील वेळ नदीसह परिसरातील विहिरी, कुपनलिका, तलाव कोरडे ठणठणीत पडले आहेत. पिण्यासह वापराच्या पाण्याची

तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे. त्यामुळे भावडीच्या सरपंच कमल कातळे, उपसरपंच सोपानराव काळे, दूध डेअरी चेअरमन बाबाजी कुदळे यांनी पंचायत समितीकडे अर्ज करून गावात पाण्याच्या टँकरची मागणी केली. त्यानुसार टँकर सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मात्र, गावात टँकर येताच नागरिकांची टँकरभोवती मोठी गर्दी होत आहे. सकाळपासूनच घरातील महिला, पुरुष, लहान मुले सर्वचजण पाणी भरण्याची भांडी घेऊन हजर असतात. अनेकदा पाणी वाटप करताना भांडणे, वाद होत आहेत.

ते होऊ नये यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी यांची नेमणूक करून समान वाटप केले जात आहे, असे राज्य पोलिस पाटील संघटनेचे विभागीय अध्यक्ष गोरक्षनाथ नवले यांनी सांगितले. पाणी वाटप करताना मोठी कसरत होत असल्याचे ग्रामपंचायत कर्मचारी आनंद चक्कर पाटील यांनी सांगितले. तर टँकरची संख्या वाढवावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक संघाचे तालुका सचिव सोपानराव गणपत नवले, माजी सरपंच शिवाजीराव मोरे यांनी केली आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT