दुष्काळी व्यथा : पिके आणि शेतकरीही संकटात.. | पुढारी

दुष्काळी व्यथा : पिके आणि शेतकरीही संकटात..

पिंपरखेड : पुढारी वृत्तसेवा : शिरूर तालुक्यात झालेला अत्यल्प पाऊस आणि मार्चमध्येच वाढलेल्या कडक उष्णतेमुळे पाणीपातळीत झपाट्याने घट झाली आहे. कुकडी नदीवरील कोल्हापूर पध्दतीचे बंधारे कोरडठाक पडल्याने या पाण्यावर अवलंबून असलेल्या कांदा व इतर पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकरी संकटात सापडला आहे.अशा परिस्थितीत शेतकर्‍यांची काळजी व्यक्त करणारे शेतकरी पुत्र उमेदवार, राजकीय नेते लोकसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत गुंतले असून, ऐन दुष्काळाचे संकट गडद होत असताना शेतकर्‍यांच्या समस्यांवर मतदानाची पोळी भाजणार्‍या राजकीय नेत्यांकडून शेतकर्‍यांच्या समस्यांवर उपाययोजना कधी होणार, असा प्रश्न शेतकरीवर्गातून उपस्थित केला जात आहे.

शिरूर तालुक्यातील बेटभागात कुकडी व घोडनदी तसेच मीना कालव्याच्या पाण्यावर शेतकर्‍यांकडून पिकांचे नियोजन केले जाते. समाधानकारक पाऊस न झाल्याने यावर्षी पाणीपातळीत लक्षणीय घट झाली. परिणामी, विहिरी, कुपनलिकाची पाणीपातळी खालावली मीना कालव्याला आलेल्या उन्हाळी आवर्तनामुळे उन्हाळी कांदा, ऊस पिकांबरोबर इतर पिकांना दिलासा मिळाला. कडक उष्णतेमुळे कालव्याच्या पाण्याचा दिलासा काही दिवसांतच ओसरला. मार्च महिन्यातच कमाल तापमानाचा पारा 40 अंशांवर गेल्याने कडक उष्णतेमुळे पाणीपातळीत झपाट्याने घट झाली.

बेट भागातील वडनेर खु. येथील कुकडी नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा कोरडाठाक पडला. बेट भागात कांद्याचे आगार म्हणून ओळख असलेल्या वडनेरमध्ये कांदा फुगवणी अवस्थेत दोन पाणी न मिळाल्याने शेतकर्‍यांच्या उत्पादनात मोठी घट झाली. काही शेतकर्‍यांचे कांदा, ऊस कडक तापमानात पाण्याअभावी जळून गेल्याचे उपसरपंच विक्रम निचित यांनी सांगितले.
बेट भागातील शेतकरी अत्यल्प पावसामुळे दुष्काळी परिस्थितीत उपलब्ध पाण्यावर तारेवरची कसरत करत उन्हाळी पिकांची तहान भागवत असताना ऐन कडक उष्णतेत अतिरिक्त विजेच्या भारनियमनात पिकांना वेळेत पाणी मिळत नसल्याने पिके होरपळून दुष्काळी परिस्थितीचे चित्र आणखी गडद होण्याची शक्यता सद्यस्थितीत पाहायला मिळत आहे.

राजकीय नेते जोमात अन् शेतकरी कोमात

लोकसभा निवडणुकीचा आखाडा सुरू झाल्याने मैदानात उतरलेले राजकीय नेते प्रचाराची राळ उठवण्यासाठी पायाला भिंगरी बांधून फिरत असतानाच कडक उन्हाळ्यात ऐन दुष्काळी परिस्थितीत संकटाशी दोन हात करून मात करण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना शेतकरी दिसत आहे. दुष्काळी परिस्थितीत होणार्‍या या लोकसभा निवडणुकीत राजकीय नेते जोमात अन् शेतकरी कोमात, असे चित्र पाहायला मिळत आहे.

हेही वाचा

Back to top button