कितीही दबाव येऊ द्या, मी तुमच्या मागे : शरद पवार | पुढारी

कितीही दबाव येऊ द्या, मी तुमच्या मागे : शरद पवार

बारामती : पुढारी वृत्तसेवा : मला एक चिठ्ठी आली आहे, त्यात तुम्हाला पाणी हवं असेल, तर घड्याळाला मत द्या, नाहीतर तुम्हाला पाणी मिळणार नाही, कारखान्याला ऊस जायचा असेल, तर तुम्ही मते द्या अन्यथा गावातील विकासकामे बंद होतील, अशी दमबाजी केली जात असल्याचे या चिठ्ठीत म्हटले आहे. पण दबावाला घाबरायचे कारण नाही, कितीही दबाव येऊ द्या, मी तुमच्या मागे आहे. जे दबाव आणत आहेत, दम देत आहेत त्यांना त्या जागेवर मी बसवले आहे, या शब्दात ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटावर जोरदार हल्लाबोल केला.

सुपे (ता. बारामती) येथे पवार बोलत होते. त्यांच्या भाषणाच्या शेवटी उपस्थितातून एक चिठ्ठी त्यांना देण्यात आली. त्यामध्ये दबाव आणला जात असल्याचे नमूद केले होते. त्यावर पवार यांनी विरोधी गटावर जोरदार शरसंधान साधले. पवार यांनी ही चिठ्ठी वाचून दाखवली. अशा धमक्यांना घाबरू नका, त्यांना दुरुस्त करण्याची वेळ आता आली आहे, या शब्दात त्यांनी समाचार घेतला. या वेळी बोलताना पवार यांनी, देशात पाण्याची स्थिती वाईट असल्याचे सांगितले. नजीकच्या काळात चारा छावण्या सुरू कराव्या लागतील, पण दुर्दैवाने ज्यांच्या हाती सत्ता आहे त्यांना याबाबत आस्था नसल्याचे ते म्हणाले.

जिरायती भागात कांदा पीक महत्त्वाचे आहे. पण मोदी सरकारने निर्यातबंदी केली आहे. साखरेला दोन पैसे मिळतील, तर निर्यात करायची नाही, अशी सरकारची भूमिका आहे. मोदींनी शेतकरी अडकवला असल्याचे ते म्हणाले. आम्ही सत्तेत असताना चारा छावण्या बघायला मी स्वतः सरकारचा प्रतिनिधी म्हणून आलो होते. पण या सरकारला आस्था नसल्याचे ते म्हणाले. सत्तेत असताना 70 हजार कोटींची कर्जमाफी केली. कारखानदारी वाढवली. बारामती, जेजुरी, इंदापूर, चाकण, रांजणगाव, हिंजवडीत प्रकल्प आणले. हे काम आत्ताच्या सरकारने केलेले नाही, असे ते म्हणाले.

अजित पवार यांच्या गटाबाबत ते म्हणाले, जे सोडून गेले ते आता भाजपसोबत आहेत. राष्ट्रवादी कोणी उभी केली हे सगळ्यांना माहीत आहे. त्यांची भूमिका योग्य आहे का, याचा निकाल या निवडणुकीत लागेल, असे पवार म्हणाले. जनाई-शिरसाईची जबाबदारी त्यांनी पार पाडली नाही, आता ही योजना कशी कार्यान्वित होत नाही, ते पाहतो, असे ते म्हणाले.

हेही वाचा

Back to top button