Water Pudhari
पुणे

Mulshi Water Crisis: मुळशीमध्ये पाणीटंचाई तीव्र; भूगर्भजल पातळी खालावल्याने पिरंगुट परिसरात संकट

नागरीकरण, प्रदूषणामुळे विहिरी कोरड्या; शोषखड्ड्यांची गरज अधोरेखित

पुढारी वृत्तसेवा

पिरंगुट: तीव उन्हाळ्यामुळे मुळशी तालुक्यामध्ये भूगर्भातील पाणीपातळी खालावली आहे. अनेक सार्वजनिक आणि खासगी विहिरींनी तळ गाठलेला आहे. नागरिक खासगी कूपनलिका घेण्यावर भर देत आहेत. तालुक्यातील पश्चिम भागामध्ये मुळशी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून अनेक गावांना पाणीपुरवठा होत आहे. पूर्व भागामध्ये मात्र पाण्याचा तुटवडा जाणवू लागला आहे.

पूर्व भागात पिरंगुट, घोटावडे फाटा, सुतारवाडी, भूगाव, भुकूम परिसरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढल्यामुळे पाण्याची मागणी वाढली आणि पाणीपुरवठा हवा तसा होत नसल्याने पाण्याचा तुटवडा आता जाणवू लागला आहे. नागरीकरणामुळे ओढ्या, नाल्यांमध्ये सांडपाणी सोडले जात असल्यामुळे पाण्याचे प्रदूषणही वाढलेले आहे. या प्रदूषणामुळे अनेक विहिरी आणि कूपनलिकाही प्रदूषित झालेल्या आहेत. प्रदूषित पाण्यामुळेसुद्धा पाणी असूनही वापरता येत नसल्यामुळे नागरिकांची पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण झाली आहे.

पिरंगुटसारख्या मोठ्या बाजारी गावांमध्ये अनेक सोसायट्यांचे घाण मैलापाणी ओढ्यात सोडण्यात आलेले आहे. तशीच अवस्था भूगाव, भुकूममध्येसुद्धा पाहण्यास मिळते. बाथरूम तसेच स्वयंपाकघरातून बाहेर पडणारे सांडपाणी जर शोषखड्डे घेऊन त्यामध्ये सोडल्यास जमिनीत मुरणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढून जमिनीतील पाणीपातळी वाढण्यास मदत होईल.

अशा प्रकारचे 100 शोष खड्डे चिखलगाव आणि कुळे गावात डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने ग््राामपंचायतीच्या सहकार्याने घेण्यात आले होते. यामुळे त्या गावांच्या परिसरात सांडपाणी ओढ्यात जात नाही. अशा प्रकारचे शोषखड्डे ग््राामीण भागात करणे गरजेचे आहे.

पाणी जपून वापरा

बांधकामांना होणारा पाण्याचा बेसुमार वापर तातडीने थांबवावा, अशी नागरिकांची मागणी आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन मुळशी पंचायत समितीच्या सभापती मंदाताई बाबाजी शेळके आणि उपसभापती दगडूकाका करंजावणे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT