आणे-पेमदरा पठारावरील जलस्रोत कोरडेठाक; पाण्याअभावी पिके लागली करपू Pudhari
पुणे

Water Crisis: आणे-पेमदरा पठारावरील जलस्रोत कोरडेठाक; पाण्याअभावी पिके लागली करपू

जनावरांचा चारा, पाणीप्रश्न बिकट

पुढारी वृत्तसेवा

नारायणगाव: जुन्नर तालुक्याच्या आणे-पेमदरा पठारावरील ओढे, नाले, तळे कोरडी पडल्याने शेतकर्‍यांची पिके करपू लागली आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी शासनाने टँकर सुरू केले आहेत. परंतु, जनावरांच्या हिरव्या चार्‍याचा आणि त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता भेडसावू लागला आहे.

जुन्नर तालुक्याच्या आणे, नळावणे, शिंदेवाडी, वरुंडी, पेमदरा या भागामध्ये आता पिण्याच्या पाण्याची गैरसोय निर्माण होऊ लागली आहे. नळवणे या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी पाण्याचा टँकर सुरू झाला आहे. येथे जनावरांसाठीसुद्धा पाण्याची उपलब्धता करावी लागणार आहे. (latest pune news)

सुरकुलवाडी या ठिकाणचा बंधारा देखील आता आटल्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसवणार आहे. नवलेवाडी या ठिकाणी देखील पिण्याच्या पाण्याची स्थानिक नागरिकांची गैरसोय आहे. टँकर सुरू झाल्याने आता काही प्रमाणात ही गैरसोय दूर झाली आहे.

आणे येथील वाड्या-वस्त्यांची एकूण लोकसंख्या सुमारे 4 हजार 200 इतकी असून, 64 हजार लिटर सध्या पाणी या ठिकाणी पिण्यासाठी उपलब्ध करून दिले जात आहे. बिल्ली प्रादेशिक योजनेचे पाणी देखील वेळेवर येत नाही. त्यामुळे येथील जनतेची पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय होऊ लागली आहे. या भागात टँकरच्या फेर्‍या वाढवण्याची मागणी सरपंच प्रियांका दाते यांनी केली आहे.

शिंदेवाडी या ठिकाणी देखील शासनाने टँकर सुरू केला. परंतु, या टँकरच्या फेर्‍या वाढविल्या जाव्यात अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे. व्हरुंडी या ठिकाणी देखील पिण्याच्या पाण्याची वाणवा असून, विहिरी आटल्याने व भूगर्भातील पाणीसाठा कमी झाल्याने कूपनलिका देखील आटल्या आहेत.

त्यामुळे या भागातील पिके करपू लागली आहेत. या भागात सध्या काही ठिकाणी टोमॅटो आणि वाटाणा ही पिके घेतली जातात. परंतु, सध्या पाणी नसल्यामुळे टोमॅटोची पिके देखील करपू लागले आहेत. या भागात काही ठिकाणी ऊस पीक असून, पाण्याअभावी ते सुद्धा जळाले आहे. त्यामुळे काही शेतकर्‍यांनी चार्‍यासाठी उसाची विक्री सुरू केली आहे.

पेमदरा येथील चोळीच्या बंधाऱ्याचे पाणी कमी झाल्याने शेतीला पाणीपुरवठा कमी प्रमाणात करावा लागत आहे. तीन दिवसांनंतर शेतकर्‍यांना या ठिकाणाहून पाणी उचलावे लागत आहे. पूर्ण मे महिना व जून महिना शेतकर्‍यांसाठी मोठा अडचणीचा जाणार आहे.

दरम्यान, हिवरे तर्फे नारायणगाव, सातपुडा या भागात देखील पिके पाण्याअभावी जळाली आहेत. मीना कालव्याला तत्काळ पाणी सोडावे, अशी मागणी शेतकर्‍यांची होऊ लागली आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय झाल्यावर पाणी सोडले जाईल, असे संबंधित अधिकारी शेतकर्‍यांना सांगत आहेत. परंतु, कोवळ्या पिकांना पाणी नसल्यामुळे शेतकर्‍यांच्या शेतातील पिकाचे मोठे नुकसान होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT