

बारामती: वाहतूक पोलिसांनी गेल्या महिन्यात फटफट असा आवाज काढणार्या बुलेटस्वारांवर कारवाई केली. सायलेन्सरमध्ये असे बदल घडविणार्या व विक्री करणार्या विक्रेत्यांवरही कारवाई केली. मात्र, कारवाई केल्यानंतर शहरात असे प्रकार काहीसे थांबले असताना ग्रामीण भागात मात्र ते वाढले आहेत.
फटफट असा आवाज करीत वेगाने जाणार्या बुलेट नागरिकांसाठी त्रासदायक ठरू लागल्या आहेत. याला आळा घालण्याची गरज नागरिक व्यक्त करीत आहेत. सध्या बारामती तालुक्यात गावोगावच्या यात्रा-जत्रा सुरू आहेत. त्यानिमित्त महिला-तरुणी देवदर्शन व खरेदीनिमित्त बाहेर पडत आहेत. त्यांना या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महिला-युवतींच्या अगदी जवळून फटफट आवाज काढत गाड्या चालविल्या जात आहेत. (latest pune news)
दुचाकी वाहनांमध्ये बदल करून, जास्त आवाजाचे सायलेन्सर आणि हॉर्न बसविले जातात. तसेच, मोटारींमध्ये कर्कश साउंड सिस्टीम बसवून मुख्य रस्ते, वर्दळीची ठिकाणे तसेच शहर व ग्रामीण परिसरात बुलेटस्वार सुसाट वेगात फेरफटका मारत आहेत. सोमेश्वरनगर परिसरात दिवसेंदिवस असे प्रकार वाढले आहेत. पोलिसांकडून अशा लोकांवर अधूनमधून कारवाई होते. परंतु, यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे.
ग्रामीण भागात पोलिसांनी घेतलेल्या बघ्याच्या भूमिकेमुळे नागरिकांना मनस्ताप होत आहे. जवळच असलेल्या पोलिस ठाण्याबाहेरील रस्त्यावरच या गाड्या फेरफटका मारत असतात. परंतु, अशा बेकायदा वाहनांवर कारवाई करण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांची आहे, तशीच ती आरटीओचीही आहे. मात्र, मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणार्यांवर व गाड्यांवर कारवाई करण्यात प्रशासन हतबल ठरल्याचे चित्र आहे.
पालकांकडून दिले जाते प्रोत्साहन
अशा वाहनांवर स्थानिक पोलिस व वाहतूक पोलिस तसेच उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कारवाई करत असतात. मात्र, यामध्ये सातत्य राहत नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. सोमेश्वरनगर, वडगाव, कोर्हाळे, माळेगाव, पणदरे, बारामती शहर आदी भागांत असे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत. विशेष म्हणजे, अल्पवयीन मुले बुलेट चालवत असताना पालकांकडून त्यांना रोखण्याऐवजी प्रोत्साहन दिले जात आहे. त्यातून एखाद्या गंभीर अपघाताचीही शक्यता नाकारता येत नाही.