वतनाच्या जमिनी कवडीमोल भावाने विकल्या जात असल्याचे दुर्दैवी चित्र File Photo
पुणे

Watan Land Scam: वतनदार झाले कंगाल अन्‌‍ विकणारा मालामाल!

वतनाच्या जमिनी कवडीमोल भावाने विकल्या जात असल्याचे दुर्दैवी चित्र

पुढारी वृत्तसेवा

निमोणे : कोरेगाव पार्क येथील महार वतन जमिनीच्या संशयास्पद व्यवहाराने संपूर्ण राज्य ढवळून निघाले आहे. दस्तुरखुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या संबंधित हा व्यवहार असल्याने मोठ्या प्रमाणात या व्यवहाराच्या सुरस कथा प्रसारमाध्यमात प्रसिद्ध होत आहेत; मात्र गावोगावी अनेक धनदांडग्यांनी वतनी जमिनी घशात घालून मूळ वतनदारांना देशोधडीला लावले आहे. वतनाची जमीन म्हणजे खरेदी-विक्रीच्या व्यवहारात तिला काहीच आडकाठी नाही, अशाच पद्धतीचं वातावरण निर्माण करण्यात तथाकथित दलाल यशस्वी झाले आहेत.(Latest Pune News)

शिरूर तालुक्यातील असं एकही गाव नाही, ज्या ठिकाणी कवडीमोल भावात महार वतन जमिनी लाटल्या गेल्या नाहीत. गावकुसाच्या एकदम जवळ असणाऱ्या रस्त्याच्या कडेच्या या जमिनी आर्थिक विवंचनेमुळे योग्य पद्धतीने कसल्या जात नाहीत, वारसदारांमध्ये असलेला बेबनाव याचा गैरफायदा घेऊन अडचणीत आलेल्या वतनदारांना हेरून वतनाची जमीन विकायची म्हटल्यावर ‌’लय किचकट विषय आहे, वरपासून खालपर्यंत फाईल फिरते, प्रत्येक टेबलला हात ओले करावे लागतात‌’ अशा पद्धतीची सुरुवात करून अतिशय पडेल दराने या जमिनीचा सौदा ठरतो.

सौदा ठरवणारे पहिल्या झटक्यात कुलमुखत्यारपत्र स्वतःच्या नावावर करून घेतात, काही हजारात किंवा जास्तीत जास्त 5 ते 6 लाख रुपये एकर या दराने व्यवहार ठरतो. तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कुळ कायदा शाखा या ठिकाणी उठबस असणाऱ्या मंडळींचा वतनी जमिनी खरेदी-विक्री व्यवसायात दलाल म्हणून सक्रिय सहभाग असल्याचे अनेकदा पुढे आले आहे. वतनी जमिनीच्या विक्री परवानगीसाठी प्रकरण दाखल करण्यापूर्वीच मालदार पार्टी पाहून तीन ते चार पट चढ्या दराने दुसऱ्याशी व्यवहार केला जातो. मूळ मालकाला तीन टप्प्यात पैसे मिळतात; मात्र जो मध्यस्थ दलाल आहे, ज्याच्या नावाने कुलमुखत्यार आहे तो मात्र या वतनी जमिनीत मालामाल होतो, हे आजरवरचे चित्र आहे.

आजच्या घडीला गावगाड्यातील महार, रामोशी, गुरव, घडशी ही वतने मोठ्या प्रमाणात खालसा झाली आहेत. त्याच गावात राहणारी ही मूळ वतनदार भूमिहीन म्हणून जीवन जगत आहेत. कवडीमोल किमतीने लाटलेल्या वतनाच्या जमिनींचे व्यवहार हे अनेकदा चुकीच्या पद्धतीचे वारस उभे करून किंवा खोटे दस्त तयार करून हडप केले गेल्याची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे,

शिरूर तालुक्यातील एका मोठ्या राजकीय नेत्याने महार वतनाची जवळजवळ 100 एकर जमीन लाटल्याच्या सुरस कथा मध्यंतरी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात या गोष्टीची चर्चा होत होती.

बाहुबलींनी गावखेड्यातील लाटलेल्या जमिनीची चौकशी व्हावी

प्रसारमाध्यमांनी पार्थ पवारांचे प्रकरण उचलून धरले, जनमानसाचा रेटा तयार झाला. परिणामी मूळ वतनदारांना काही प्रमाणात दिलासा निर्माण झाला आहे; मात्र हेच भाग्य गावखेड्यातील वतनदारांच्या नशिबी नाही. कवडीमोल किमतीने त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन गावखेड्यातील बाहुबली वतनी जमिनी लुटून गडगंज झाले. मूळ वतनदारांचे वारस स्वतःच्या गावात भूमीहिन झाले असल्यामुळे या सर्व संशयास्पद व्यवहाराची उच्चस्तरीय समिती नेमून तपासणी केली पाहिजे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विलास गायकवाड यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT