पुणे

भ्रष्टाचार लपविण्यासाठी कचरा डेपोस आग ; राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांचा आरोप

backup backup

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : मोशीतील कचरा डेपोला बुधवारी (दि. 6) लागलेली आग ही संशयास्पद आहे. कामे न करताच कोट्यवधी रुपयांची बिले उचलणार्‍या भाजपधार्जिण्या ठेकेदारांना व त्यातून भ्रष्टाचार करणार्‍या भाजपच्या नेत्यांना वाचविण्यासाठी ती आग लावण्यात आली,

असा आरोप करीत त्या घटनेची चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.

गव्हाणे म्हणाले, की कचरा डेपोचे व्यवस्थापन आरोग्य विभागामार्फत करण्यात येते. त्या ठिकाणी पर्यावरणाच्यादृष्टीने अनेक उपाययोजना केला जातात.

त्यासाठी महापालिका दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. डेपोतील ठेकेदारी पद्धतीने सुरू असलेली कामे ही भाजप आमदाराच्या मर्जीतील ठेकेदारांना देण्यात आली आहेत.

कोरोनाकाळात कोणतीही कामे न करता या ठेकेदारांना कोट्यवधी रुपयांची बिले अदा करण्यात आली आहेत. वेस्ट टू एनर्जी, बायोमायनिंग,

कॅपिंग, औषध फवारणीसारखी करोडो रुपयांची कामे भाजपच्या कारभार्‍याने आपल्या बगलबच्च्यांना देऊन मोठा भ्रष्टाचार केला आहे.यातील एकही काम पूर्णत्वास गेलेले नाही. सत्तेच्याजोरावर मुदतवाढ देऊन ठेकेदार पोसण्याचे काम भाजपच्या सत्ताधार्‍यांनी केले आहे.

ठेकेदारांना वाचविण्यासाठी व भाजपच्या पदाधिकार्‍यांनी गेल्या पाच वर्षांत मोशी कचरा डेपोच्या माध्यमातून लुटलेली कोट्यवधींची माया दडपण्याचाही प्रयत्न या आगीच्या माध्यमातून करण्यात आला आहे, असा आरोप अजित गव्हाणे यांनी केला आहे.

SCROLL FOR NEXT