Narayangaon News : वारूळवाडी दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतर विरोधी आंदोलन स्थगित File Photo
पुणे

Narayangaon News : वारूळवाडी दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतर विरोधी आंदोलन स्थगित

दुय्यम निबंधक अर्चना पाकळे यांनी लेखी दिलेल्या आश्वासनानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

पुढारी वृत्तसेवा

Warulwadi Sub-Registrar Office migration against agitation suspends np88

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा

वारूळवाडी येथील दुय्यम निबंधक कार्यालय नारायणगाव येथील बिल्डरच्या खासगी जागेत हालवण्यात येऊ नये या मागणीसाठी वारुळवाडीच्या दुय्यम निबंधक कार्यालयाच्या समोर तीन दिवसांपासून उपोषण सुरू होते. गुरुवारी (दि. 29) रात्री नऊ वाजता दुय्यम निबंधक अर्चना पाकळे यांनी लेखी दिलेल्या आश्वासनानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

यावेळी वारूळवाडीचे सरपंच विनायक भुजबळ, पुणे जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष रमेश भुजबळ, नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, मंडल अधिकारी शितल गर्जे भाजपाचे आशिष माळवदकर, संजय वारुळे आशिष फुलसुंदर, वरुण भुजबळ आदी उपस्थित होते.

वारुळवाडी येथे असलेले दुय्यम निबंधक कार्यालय नारायणगावच्या बिल्डरच्या खासगी जागेत हालवण्यात येऊ नये या मागणीसाठी 27 मे पासून शशिकांत पारधी व नितीन भालेकर हे उपोषणाला बसले होते. त्यांच्या उपोषणाला ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल मेहर यांच्यासह वारुळवाडीच्या ग्रामस्थांनी पाठिंबा दिला होता.

दरम्यान वारुळवाडी ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीमध्ये दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतर करण्यासाठी ग्रामपंचायतीने विहित कार्यपद्धती अवलंबून मुख्याधिकारी जिल्हा परिषद यांची मान्यता घेऊन या कार्यालयास योग्य तो नोंदणीकृत दस्‍त करून दिल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार हे कार्यालय तात्पुरते वारुळवाडी ग्रामपंचायत हालवण्यात येईल असे लेखी पत्र दुय्यम निबंधक अर्चना पाकळे यांनी उपोषणकर्त्यांना दिले.

दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारुळवाडी या ठिकाणी दुय्यम निबंधक कार्यालय बांधण्यासाठी 55 लाख रुपये निधी मंजूर केला असल्याची माहिती वरुण भुजबळ यांनी दिली. हे कार्यालय कोणाच्याही खासगी जागेत स्थलांतरित करण्यात येणार नाही असा शब्द महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आम्हाला दिला असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. वारुळवाडीच्या ग्रामस्थांच्या एकत्रित लढ्‍याला हे यश आल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT