महापालिकेच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 32 मधून चारही नगरसेवक राष्ट्रवादी काँग््रेासचे निवडून आले होते. त्यांच्या माध्यमातून प्रभागातील विविध विकासकामे मार्गी लागली असली, तरी वारजे येथील महामार्गालगतच्या दोन्ही सेवा रस्त्यांचे काम अद्यापही रखडलेल्या अवस्थेत आहेत. एनडीए मुख्य रस्ता आणि सेवा (सर्व्हिस) रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. या समस्येपासून सुटका होणार तरी कधी? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
वारजे परिसरात दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र, याबाबत उपाययोजना करण्याकडे माजी लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे परिसरातील रस्त्यांचा वाहतूक कोंडीने कोंडलेला श्वास मोकळा होणार कधी? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते गणपती माथ्यापर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न सोडविण्यास देखील प्रशासनाला अपयश आल्याचे दिसून येत आहे. या प्रभागाचे नागरीकरण दिवसेंदिवस वाढत आहे. 2017-2022 या कालावधीत दिलीप बराटे, सचिन दोडके, दीपाली धुमाळ, सायली वांजळे-शिंदे हे चारही नगरसेवक राष्ट्रवादी काँग््रेासचे होऊन गेले आहेत.
या लोकप्रतिनिधींनी उपलब्ध निधीतून पायाभूत सुविधा, पदपथ, महापालिकेच्या शाळांची दुरुस्ती, विजेची कामे, जलवाहिन्या, सुशोभीकरण, क्रीडासंकुल, उद्याने, सांस्कृतिक भवन, खेळाची मैदाने, महापालिकेचे रुग्णालय, पावसाळी वाहिन्या, रस्त्यांचे डांबरीकरण आणि कॉंक्रिटीकरण, ड्रेनेजलाइन आदी विकासकामे केली आहेत. कोरोनामुळे 2022 नंतर निवडणुका झाल्या नसल्याने महापालिकेत प्रशासकराज आहे. नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी लोकप्रतिनिधी नसल्याने प्रभागात सध्या विविध समस्या जाणवत आहेत. कचऱ्याच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. परिसरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. वारजे, रामनगरशेजारील कालवा रस्ता तसेच सेवा रस्त्यांसह मुख्य रस्त्यांवरील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. डुक्कर खिंड ते तिरुपतीनगर डीपी रस्त्याचे काम रखडलेल्या अवस्थेत आहे. वारजेतील महामार्गालगतच्या 12 मीटर सर्व्हिस रस्त्याचे काम अद्यापही रखडलेल्या अवस्थेत आहे.
महापालिकेचे बराटे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, आरोग्य केंद्र, क्रीडासंकुल, रस्ते, उद्याने, पाण्याची समस्या सुटलेली आहे. प्रशासनाने स्थानिकांना जागेचा मोबदला दिला नसल्याने सेवा रस्ते आणि मुख्य रस्त्याचे रुंदीकरण रखडले आहे. रिंगरोडसाठी उमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. तसेच डीपी रस्ते, मुख्य रस्त्यांच्या कामासाठी देखील पाठपुरावा करण्यात येत आहे.दिलीप बराटे, माजी नगरसेवक
या प्रभागात पार्किंगव्यवस्था, सार्वजनिक स्वच्छतागृह, भाजी मंडई, रस्त्यांवर वाढती अतिक्रमणे आदी समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहेत. वारजे एनडीए मुख्य रस्त्यावर दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच, अनेक विकासकामे रखडली असून, ती पूर्ण कधी होणार? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पाण्याची टाकी, रस्ते, उद्यान, विरंगुळा केंद्र, साहित्यिकांसाठी साहित्यिक कट्टा, जलतरण तलाव, पस्तीस एकरामध्ये संजीवन वन उद्यान आदी कामे केली आहेत. क्रीडासंकुल व सांस्कृतिक भवनाचे काम निधीअभावी संथगतीने सुरू आहे. डुक्कर खिंड ते तिरुपतीनगर डीपी रस्त्याच्या कामासाठीही पाठपुरावा सुरू आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महापालिका आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला आहे.दीपाली धुमाळ, माजी नगरसेविका
माननीयांना या प्रश्नांची द्यावी लागतील उत्तरे
वारजे मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाकडे दुर्लक्ष का?
वारजे रस्त्यावरील अतिक्रमणे वर्षांनुवर्षे ‘जैसे थे’ का?
सेवा रस्त्याचे काम अजून किती वर्षे रखडणार?
डीपी रस्ते वर्षानुवर्षे का रखडले आहेत?
नाल्यांतील सांडपाणी रस्त्यावरून का वाहते?
प्रभागातील प्रमुख समस्या
वारजेतील एनडीए रस्त्याच्या रुंदीकरणाअभावी होणारी वाहतूक कोंडी
महामार्गालगतच्या सेवा रस्त्यांचे काम रखडल्याने वाहतुकीची समस्या गंभीर
परिसरात नागरीकरण वाढल्यामुळे वाहतुकीसाठी अपुरे पडणारे रस्ते
रस्त्यांवरील अतिक्रमणे वाढल्यामुळे पादचाऱ्यांची होणारी गैरसोय
रस्त्यांवर पावसाळी वाहिन्या नसल्याने दरवर्षी तुंबणारे पावसाचे पाणी
भाजी मंडई आणि पार्किंगव्यवस्थेच्या अभावामुळे नागरिकांची गैरसोय
रामनगर, खानवस्तीपर्यंत कालवा रस्ता आणि ड्रेनेजलाइनची झालेली दुरवस्था
कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने निर्माण होणारी अस्वच्छतेची समस्या
प्रभागात रस्ते, ड्रेनेजलाइन आदींसह विविध विकासकामे केली आहेत. न्यू अहिरेगाव येथे जलकुंभ तसेच स्व. रमेश वांजळे ई-लर्निंग स्कूलचे काम सुरू आहे. गणपती माथा बस स्टॉपजवळ सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे. तसेच गणपती माथा ते शिंदे पुलापर्यंत जॉगिंग ट्रॅक उभारण्यात आला आहे.सायली वांजळे-शिंदे, माजी नगरसेविका
प्रभागात झालेली प्रमुख कामे
जॉगिंग ट्रॅक आणि उद्यानांचा विकास
डुक्कर खिंड आणि रामनगर येथे चोवीस तास पाणीपुरवठा
योजनेंतर्गत सुरू असलेले पाण्याच्या टाक्यांचे काम
आरोग्य केंद्रासह कै. सुभद्रा बराटे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी
छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची उभारणी
डुक्कर खिंड येथे पस्तीस एकरांमध्ये संजीवन वन उद्यान विकसित
सिप्ला हॉस्पिटलजवळ सांस्कृतिक भवन उभारण्याचे काम सुरू
अग्निशमन केंद्राची उभारणी
स्पोर्ट कॉम्प्लेक्स आणि छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमची उभारणी केली आहे. वारजे सेवा रस्त्यावर चर्च ते माई मंगेशकर हॉस्पिटल आणि स्वर्णा हॉटेल ते पॉप्युलर चौकादरम्यानच्या सेवा रस्त्यासाठी महापालिकेकडून साडेचार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सेवा रस्त्यांसह डुक्कर खिंड ते तिरुपतीनगर डीपी रस्त्याच्या कामासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे.सचिन दोडके, माजी नगरसेवक