खडकवासला: पानशेत-वरसगाव खोर्यातील पावसाने गेल्या 24 तासांत खडकवासला धरणसाखळीत अर्धा टीएमसीपेक्षा अधिक पाण्याची वाढ झाली. धरणसाखळीतील सर्वांत मोठे वरसगाव (वीर बाजी पासलकर जलाशय) धरण अर्धे भरले आहे. धरणात 50.66 टक्के साठा झाला आहे. शुक्रवारी (दि. 27) सायंकाळी पाच वाजता चार धरणांच्या साखळीत 13.36 टीएमसी म्हणजे 45.84 टक्के पाणीसाठा झाला होता.
धरणसाखळीत गुरुवारी (दि. 26) सायंकाळी पाच वाजता 12.84 टीएमसी पाणी होते. वरसगाव धरण शाखेच्या शाखा अभियंता प्रतीक्षा रावण म्हणाल्या की, डोंगरी पट्ट्यात रिमझिमसह अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. ओढ्या-नाल्यांतून पाण्याची आवक सुरू असल्याने धरणसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. वरसगाव धरणानंतर पानशेत धरणही पन्नास टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. (Latest Pune News)
गतवर्षीच्या तुलनेत धरणसाखळीत जवळपास दहा टीएमसी अधिक पाणी आहे. गेल्या वर्षी 27 जून 2024 रोजी धरणसाखळीत केवळ 3.57 टीएमसी पाणी होते. पानशेत खोर्यात रिमझिम सुरू असली तरी खडकवासला धरणक्षेत्रात तुरळक पाऊस होता. त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रातील विसर्ग कमी करण्यात आला.
सध्या केवळ 342 क्सुसेक पाणी मुठा नदीत सोडले जात आहे. याशिवाय मुठा कालव्यात 352 क्सुसेक पाणी सोडले जात आहे.दिवसभरात टेमघर येथे 10, वरसगाव येथे 12 व पानशेत येथे 10 मिलिमीटर पाऊस पडला. खडकवासला येथे पावसाची उघडीप होती.