

पुणे: राज्य सरकारने गतवर्षी राबविलेल्या दूध अनुदान योजनेत शेतकर्यांना देय असलेल्या अनुदानापोटीची सुमारे 28 कोटी 63 लाख 57 हजार 680 रुपयांइतके अनुदान हे 19 जून रोजी एक लाख 68 हजार 848 शेतकर्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर जमा केल्याची माहिती राज्याचे दुग्धव्यवसाय विकास आयुक्त प्रशांत मोहोड यांनी दिली. उर्वरित सहा कोटी 93 लाख रुपयांचे अनुदान वितरण फेरतपासणीनंतर वितरित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यात म्हणजे 11 जानेवारी 2024 ते 10 मार्च 2024 या कालावधीतील प्रत्यक्षात सुमारे 35 कोटी 57 लाख 55 हजार 110 रुपयांइतके अनुदान देणे बाकी राहिले होते. ही रक्कम एक लाख 94 हजार 145 शेतकर्यांची होते. (Latest Pune News)
त्यापैकी ज्या प्रकल्पांची भरारीपथकांद्वारे तपासणी व छाननी झालेली आहे. त्या प्रकल्पांमध्ये कुठल्याही प्रकारच्या त्रुटी आढळून आलेल्या नाहीत. अशा प्रकल्पांमधील देय दूध अनुदान प्रामुख्याने वितरित करण्यात आल्याचे नमूद करून ते म्हणाले, उर्वरित दूध प्रकल्पांचे फेरतपासणी करणे प्रस्तावित आहे. फेर तपासणीनंतरच उर्वरित प्रकल्पांतील दूध उत्पादक शेतकर्यांचे अनुदान वर्ग करण्यात येईल आणि ज्या प्रकल्पांमध्ये अनियमितता झालेली आहे, त्या प्रकल्पांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल.
46 कोटींची मागणी
तसेच सात रुपये अनुदान योजनेमधील (दि. 1 ऑक्टोबर 2024 ते 30 नोव्हेंबर 2024) 46 कोटी पाच लाख 88 हजार 457 रुपयांइतके अनुदान बाकी होते. ही रक्कम सुमारे एक लाख 87 हजार 313 शेतकर्यांना देणे बाकी राहिले होते.
ज्या प्रकल्पांची भरारी पथकाद्वारे तपासणी व छाननी झालेली आहे. त्या प्रकल्पांमध्ये कुठल्याही प्रकारच्या त्रुटी आढळून आलेल्या नाहीत. शासनाकडे पुरवणी मागण्यांमध्ये ही अनुदानाची थकीत रक्कम मागणी केली आहे. ती शासनाकडून उपलब्ध होताच त्वरित दूध उत्पादक शेतकर्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे वर्ग करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, प्रथम पाच रुपयांप्रमाणे प्रति लिटर दूध अनुदान योजनेतून आत्तापर्यंत 941 कोटी आणि सात रुपये अनुदानाप्रमाणे 578 कोटी मिळून आत्तापर्यंत राज्यात एक हजार 519 कोटी रुपयांचे दूध अनुदान वितरण झाल्याचे त्यांनी सांगितले.
दूध रूपांतरणासाठीचे 28 कोटी अनुदान वितरित
शासनाने दूध भुकटी व बटरचे कोसळलेले दर विचारात घेता, दूध भुकटी प्रकल्पांना दूध भूकटी निर्यातीसाठी प्रति किलोला 30 रुपये व दूध रूपांतरणासाठी प्रति लिटरला 1.50 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत या योजनेंतर्गत एकूण खासगी व सहकारी 32 प्रकल्पांनी सहभाग घेतला आहे.
सहभागी 32 प्रकल्पांपैकी 21 दूध भुकटी प्रकल्पांनी आपली माहिती सॉफ्टवेअरमध्ये बिनचूक अपलोड केली. त्यामुळे रूपांतरित केलेल्या 38 कोटी 84 लाख 76 हजार 68 लिटर दुधाच्या रूपांतरणाकरिता 58 कोटी 27 लाख 14 हजार 61 रुपयांइतके प्रोत्साहनपर अनुदान डीबीटीद्वारे वर्ग केले आहे व अनुदान वितरणाची कार्यवाही सध्या सुरू असल्याचे ते म्हणाले.