Retired Policeman Beaten: निवृत्त पोलिसाला बेदम मारहाण; धनकवडीमधील राजीव गांधी वसाहतीतील घटना
पुणे: रस्त्यात दुचाकी आडवी लावून गप्पा मारत थांबलेल्या टोळक्याला गाडी बाजूला घ्या, असे म्हटल्याच्या कारणातून तिघांनी निवृत्त पोलिसाला लाकडी दांडके आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. मारहाणीत त्यांच्या डोळ्याला दुखापत झाली असून, नाकातून रक्तस्राव झाला आहे. प्रवीण यशवंत पाटील (वय 58, रा. पद्मछाया सोसायटी, चव्हाणनगर, धनकवडी) असे मारहाण झालेल्या पोलिसाचे नाव आहे.
या प्रकरणी पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सहकारनगर पोलिसांनी सुनील गौतम कसबे (वय 30, रा. धनकवडी), जतीन मधुकर बोळे (वय 22, रा. श्रीरामनगर चाळ, गोविंदराव पाटीलनगरजवळ, धनकवडी) आणि त्यांच्या एका साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 24 जून रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास राजीव गांधी वसाहत कॉर्नरला चव्हाणनगर धनकवडीत घडला आहे. (Latest Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील हे जानेवारी 2025 मध्ये पोलिस दलातून निवृत्त झाले असून त्यांची मुले परदेशात असतात. पुण्यात ते आणि त्यांची पत्नी राहतात. 24 जून रोजी रात्री 10 वाजता ते दुचाकीवरून घरी निघाले होते. त्या वेळी राजीव गांधी वसाहतीच्या कॉर्नरला वसाहतीत राहणारा सुनील कसबे, जतीन बोळे व त्याचा साथीदार हे दुचाकी गाड्या रस्त्यात आडवी लावून गप्पा मारत उभे होते. या वेळी पाटील यांनी त्यांना गाडी थोडी बाजूला घ्या, मला जाण्यास अडथळा होतोय, असे म्हटले. तेव्हा आरोपींनी ‘तुला काय प्रॉब्लेम आहे, बाजुने निघून जा,’ असे म्हणाले.
त्यावर पाटील यांनी गाडी थांबवली. हे पाहून जतीन बोळे हा त्यांच्या अंगावर धावून आला. गचांडी पकडू लागला. सुनील कसबे व त्याचा साथीदार लाथाबुक्क्यांनी मारहाण करू लागला. जतीन बोळे याने लाकडी दांडक्याने मारहाण केली. तेव्हा तेथील महिलांनी आरडाओरडा केल्यावर सोसायटीतील लोक धावून आले. हे पाहून त्यांनी ‘तुला बघून घेतो,’ असे सांगून ते निघून गेले.
या मारहाणीत त्यांच्या दोन्ही डोळ्यांना दुखापत झाली. नाकातून रक्त आले. त्यांच्यावर भारती विद्यापीठ हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गौड यांनी सांगितले की, या घटनेची माहिती मिळताच गुन्हा दाखल केला आहे. तिघांना नोटीस देण्यात आली असून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

