पुणे : रस्त्याने चाललेल्या ज्येष्ठ नागरिकाला निर्जनस्थळी गाठून त्याच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन चोरून नेणाऱ्या दुचाकीस्वार चोरट्याला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून गुन्ह्यातील ऐवज व दुचाकी जप्त केली आहे.
उमर नूर खान (वय १८, रा. नवाधीश पार्क, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. ही घटना १२ डिसेंबर रोजी रामटेकडी परिसरातील मधुबन सोसायटीकडून हिलसाईड अपार्टमेंटकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली होती. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक असून १२ डिसेंबर रोजी ते रामटेकडी परिसरातील टेकडीजवळून जात असताना दुचाकीवरील चार चोरट्यांनी त्यांना अडवून हाताने मारहाण केली. त्यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने काढून घेतली आणि चोरटे पसार झाले. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पथकाने तपासाला गती दिली.
पोलिस अंमलदार विष्णू सुतार, विठ्ठल चोरमले व अभिजित चव्हाण यांना माहिती मिळाली की टोळक्यापैकी एकजण गंगा सॅटेलाईट सोसायटीजवळील ओढ्यावरील पुलावर दुचाकीवर बसून कोणाची तरी वाट पाहत थांबला आहे. वानवडी ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अल्फाज शेख व पथकाने घटनास्थळी धाव घेत आरोपी उमर नूर खान याला ताब्यात घेतले. अंगझडतीत त्याच्याकडून सोनसाखळी मिळून आली.
ही कामगिरी उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहायक पोलिस आयुक्त नम्रता देसाई, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पोलिस निरीक्षक संगीता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक, उपनिरीक्षक अल्फाज शेख तसेच अतुल गायकवाड, दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, विष्णू सुतार, विठ्ठल चोरमले, अभिजित चव्हाण, गोपाळ मदने यांच्या पथकाने केली.