Election Analysis Pudhari
पुणे

Pune Municipal Elction Analysis: वानवडी प्रभागात काँग्रेस–भाजपमध्ये काँटे की टक्कर; प्रशांत जगतापांनी सिद्ध केला बालेकिल्ला

प्रभाग क्रमांक 18 मध्ये दोन्ही पक्षांना प्रत्येकी दोन जागा; शिवरकर व घोगरे यांचा पराभव

पुढारी वृत्तसेवा

सुरेश मोरे

वानवडी: निवडणूक प्रक्रिया सुरू असताना राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाला ‌‘रामराम‌’ करून काँग््रेासची पताका खांद्यावर घेतलेल्या प्रशांत जगताप यांनी स्वत:ला सिद्ध केलेच. शिवाय, वानवडी हा काँग््रेासचा बालेकिल्ला असल्याचे दाखवून दिले. दोन्ही बाजूंनी चारही जागा जिंकण्यासाठी अटीतटीचे प्रयत्न करण्यात आले होते. शेवटी भाजप आणि काँग््रेास पक्षाला या प्रभागात दोन- दोन जागांवर समाधान मानावे लागले. या चुरशीच्या लढतीत माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचे पुत्र माजी नगरसेवक अभिजित शिवरकर, भाजपचे माजी नगरसेवक धनराज घोगरे यांना पराभव स्वीकारावा लागला.

वानवडी- साळुंखे विहार प्रभाग क्रमांक 18 मध्ये भाजप आणि काँग््रेास पक्षात ‌‘काँटे की टक्कर‌’ झाली. प्रशांत जगताप हे राष्ट्रवादी काँग््रेास (श. प.) मध्ये होते. त्या काळात शहराध्यक्षपदी असताना जगताप यांनी भाजपविरोधी खूप आंदोलने केली होती. यामुळे प्रशांत जगताप यांचा पराभव करण्यासाठी खूप मोठी व्यूहरचना वानवडी प्रभागात सर्व स्तरांतून आखली गेली होती. जगताप राष्ट्रवादीमध्ये असताना त्यांनी प्रभागातील घरोघरी ‌‘तुतारी‌’ चिन्ह पोहचविले होते. जसे ते काँग््रेासमध्ये गेले, तसा त्यांना पहिला धक्का राष्ट्रवादीने दिला. या प्रभागात ‌‘घड्याळा‌’कडून लढणाऱ्या उमेदवारांना ‌‘तुतारी‌’च्या चिन्हावर लढण्यास भाग पाडले. शह- काटशहाला येथून सुरुवात झाली होती. वानवडीमध्ये पहिल्यापासून माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचे वर्चस्व होते. मात्र, मधल्या काळात त्यांनाही अपयश आले होते. यामुळे काँग््रेास पक्षाला ‌‘रामराम‌’ करून त्यांचे पुत्र अभिजित शिवरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि प्रशांत जगताप यांच्यासमोर उभे राहिले. प्रभागात ‌‘कमळ‌’ व ‌‘पंजा‌’मध्ये ‌‘काँटे की टक्कर‌’ होणार, हे निश्चित झाले होते. काँग््रेासचे निष्ठावंत माजी नगरसेवक शिवाजीराव केदारी यांचे पुत्र साहिल केदारी यांनी जगतापांना साथ दिली. यामुळे तुल्यबळ लढती वानवडीत पाहायला मिळाल्या.

सर्वच पक्षांकडून प्रचार जोरदार झाला होता. घरोघरी उमेदवार पोहचले आणि अशातच, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झाले. अगदी पैसे वाटले म्हणून हमरीतुमरी, शाब्दिक चकमकी झडल्या. निकाल जसा कळाला तसा तापलेल्या तव्यावर थंडगार पाणी पडल्यावर तो जसा थंड होतो तसा वानवडी परिसर शांत झाला. या अटीतटीच्या निवडणुकीत माजी महापौर प्रशांत जगताप, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यामध्ये या निवडणुकीला शांतपणे सामोरे गेले ते माजी नगरसेवक शिवाजीराव केदारी. त्यांनी सावध पावले उचलली व मतदारांशी जवळीक साधली. काँग््रेास पक्षाचे दोन उमेदवार निवडून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

मुलाला जिंकून आणण्यासाठी बाळासाहेब शिवरकरांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. खूप प्रयत्न केले, आपला सर्व अनुभव त्यांनी या निवडणुकीत वापरला; पण त्यांना अपयश आले. ॲड. महेश पुंडे यांनी आई कालिंदा पुंडे गेल्या निवडणुकीत निवडून आल्यापासून त्यांनी मोठा जनसंपर्क परिसरात वाढविला आहे. त्या जोरावर चारही उमेदवार मी निवडून आणणार, हा विश्वास त्यांना होता. मात्र, मतदारांच्या कौलापुढे त्यांना दोन जागांवर समाधान मानावे लागले.

मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून कोण निवडून येणार, याची उत्कंठा वाढली होती. कारण, सर्वसामान्य मतदारांपासून उच्चशिक्षित मतदारांनी दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना या निवडणुकीत पसंती दाखविल्याचे स्पष्ट मतदानपेट्यांतून पाहायला मिळते. दोन्हीकडून साम, दाम, दंड वापरण्यात आला. मात्र, सुज्ञ मतदारांनी काँग््रेासचे प्रशांत जगताप, साहिल केदारी यांना व भाजपच्या कालिंदा पुंडे, कोमल शेंडकर यांना पसंती दिली. भाजपच्या दोन जागा व पुन्हा काँग््रेास पक्षाने आपले अस्तित्व या प्रभागात सिद्ध केले आहे. अटीतटीच्या लढतीत सर्वांनाच अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT