वाखारीचे रोहित्र 9 महिन्यांपासून बंदच; महावितरणचा गलथान कारभार  Pudhari
पुणे

Transformer Issue: वाखारीचे रोहित्र 9 महिन्यांपासून बंदच; महावितरणचा गलथान कारभार

ग्रामस्थांचा ‘रास्ता रोको’चा इशारा

पुढारी वृत्तसेवा

केडगाव: वाखारी (ता. दौंड) येथील शेळके कुंभारवस्ती येथील रोहित्र लवकर सुरू करावा; अन्यथा पुणे-सोलापूर महामार्ग अडवून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा परिसरातील शेतकर्‍यांसह ग्रामपंचायत सदस्य औदुंबर शेळके यांनी दिला आहे.

याबाबत त्यांनी महावितरणला निवेदन दिले आहे. त्यात म्हटले की, शेळके कुंभारवस्ती येथे 9 महिन्यांपूर्वी रोहित्र बसवले आहे. मात्र, त्या रोहित्राला मुख्य लाइनचे कनेक्शन नाही. त्यामुळे ते बंद आहे. (Latest Pune News)

यावर रोहित्रासाठी लागणारी मुख्य लाइन पुणे-सोलापूर महामार्ग क्रॉसिंगची परवानगी नाही तसेच त्याबाबतचे अंदाजपत्रक मंजूर झाले नाही, अशी माहिती महावितरणचे अधिकारी शेतकर्‍यांना देत आहेत.

दुसरीकडे, गेल्या 9 महिन्यांपासून रोहित्र बंद असल्याने येथील शेतकर्‍यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच कमी दाबाने होत असलेल्या वीजपुरवठ्यामुळे उपकरणे बंद पडणे, जळणे असे प्रकारही वाढल्याचे परिसरातील नागरिक सांगतात. त्यावर वारंवार महावितरण कार्यालयाशी संपर्क केला.

मात्र, अजूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आता आमची सहनशक्ती संपत आली आहे, असेही निवेदनात नमूद केले आहे. आता पुढील सहा दिवसांत रोहित्र सुरू करावे. ते सुरू झाले नाही, तर परिसरातील नागरिकांच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 वर ठिय्या आंदोलन करणार आहोत, असा इशाराही महावितरणला दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

शेतकर्‍यांना फटका

रोहित्र सुरू नसल्याने परिसरातील शेतकरी, विद्यार्थी, लहान उद्योगधंदे विस्कळीत झाले आहेत. त्याचा परिणाम थेट दैनंदिन जीवनावर होत आहे. विद्युत पंप, दुधाचे व्यवसाय, कोल्ड रूम यंत्रणा आदी कामे ठप्प झाली आहेत. यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक दृष्टिकोनातून मोठे नुकसान होत आहे.

रोहित्र हवेवर चालवणार होते का?

वाखारीमधील रोहित्र बसवून 9 महिने झाले आहेत. त्यानंतर महावितरण व ठेकेदाराला येथे पुणे-सोलापूर महामार्ग क्रॉसिंगची परवानगीची गरज असल्याचे समजले. त्यापूर्वी त्यांना याबाबत कल्पना नव्हती का? तसेच नवीन केबल टाकण्यासाठी अंदाजपत्रक तयार करावे लागेल, हे त्यांना आत्ताच समजले का? यापूर्वी ते हा रोहित्र हवेवर चालवणार होते काय? असे प्रश्न वाखारी येथील शेतकर्‍यांनी उपस्थित केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT