वडापुरी: इंदापूर तालुक्यात या वर्षी मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्यांनी खरीप हंगामातील पेरण्या वेळेवर आणि मोठ्या प्रमाणावर केल्या. पिके उगवून आली असून काही ठिकाणी चांगली उभारी घेतली आहे. मात्र गेल्या तीन आठवड्यांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिकांच्या वाढीवर मोठा परिणाम होत आहे.
बाजरी, मका, तूर, उडीद, सोयाबीन, सूर्यफूल अशा मुख्य पिकांची पेरणी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर झाली. सुरुवातीला अनुकूल हवामानामुळे पिकांची उगवण चांगली झाली. मात्र, जून अखेरीपासून पाऊस गायब झाला आहे. यामुळे वाढीच्या टप्प्यावर असलेल्या पिकांची अवस्था नाजूक झाली आहे. सध्या मका, बाजरी व सोयाबीनसारखी पिके मरगळलेली दिसत आहेत. (Latest Pune News)
शेतकरी सलीम पठाण आणि राजू राऊत यांनी सांगितले की, ‘पिके उगवली आहेत पण वाढ खुंटली आहे. आता दमदार पाऊस नाही आला, तर या मेहनतीवर पाणी फिरणार आहे. दररोज वार्यामुळे आणि उष्णतेमुळे पाण्याची गरज अधिक तीव्र झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज सकाळपासून सायंकाळपर्यंत जोरदार वारे वाहत आहेत. अधूनमधून ढग येतात पण पावसाच्या सरी न येताच ते निघून जातात. त्यामुळे ‘पाऊस येणार’ अशी आशा निर्माण होते आणि पुन्हा निराशा पदरी पडते.’
फक्त अन्नधान्यच नव्हे तर जनावरांसाठी चार्याची पिके, ज्वारी, गवत, नागळी इत्यादींचीही वाढ खुंटली आहे. परिणामी पशुपालनावर अवलंबून असलेल्या शेतकर्यांवर दुहेरी संकट ओढावले आहे. विशेषतः वडापुरी, काटी, रेडा, रेडणी, अवसरी, बाभूळगाव, भाटनिमगाव, भांडगाव, शेटफळ हवेली, पंधारवाडी येथील शेतकरी चिंतेत आहेत.