Pune Metro  Pudhari
पुणे

Pune Metro New Route Feasibility: वाकड-कात्रज-शेवाळेवाडी मेट्रो मार्गावर आधी फिजिबिलिटी स्टडी

डीपीआरपूर्वी तांत्रिक-आर्थिक व्यवहार्यता तपासणार; मेट्रो स्थानकांभोवती 31 ठिकाणी पार्किंग सुविधेचा महापालिकेचा आराखडा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: वाकड-कात्रज-शेवाळेवाडी या प्रस्तावित मेट्रोमार्गाबाबत पुणे महापालिकेने घाईघाईने निर्णय न घेता टप्प्याटप्प्याने पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यापूर्वी या मार्गाची तांत्रिक, आर्थिक आणि वाहतूकदृष्ट्या व्यवहार्यता (फिजिबिलिटी) तपासली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रक्रियेनंतरच पुढील कार्यवाही होणार असून, अखेरीस महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मान्यता घेणे बंधनकारक राहणार आहे.

महापालिकेच्या प्रकल्प विभागाकडून 2 मार्च 2026 रोजी महामेट्रोच्या संचालकांना यासंदर्भात पत्र पाठविण्यात आले आहे. लोकप्रतिनिधींनी या मार्गासाठी डीपीआर तयार करण्याची मागणी केल्यानंतर महापालिकेने प्रथम व्यवहार्यता अभ्यास करण्याची भूमिका मांडली आहे. दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतही या मार्गावर प्राथमिक चर्चा झाली होती. बैठकीत थेट डीपीआरऐवजी आधी फिजिबिलिटी स्टडी करून वास्तव स्थिती स्पष्ट करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. त्यानुसारच महामेट्रोला अधिकृत पत्र पाठविण्यात आले.

शहरात मेट्रोचे जाळे अधिक विस्तारित करण्यावर भर दिला जात आहे. सध्या सुरू असलेल्या तीन मार्गांव्यतिरिक्त पीसीएमसी ते भक्ती-शक्ती निगडी या मार्गाचे काम सुरू आहे. त्यानंतर स्वारगेट ते कात्रज या मार्गाचे कामही सुरू झाले आहे. वनाज ते चांदणी चौक या मार्गाचे काम लवकरच सुरू होणार आहे. तसेच, खडकवासला-स्वारगेट-मगरपट्टा-खराडी आणि हिंगणे ते नळस्टॉप या मार्गांवरही अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू आहे. आता वाकड-कात्रज- शेवाळेवाडी या नव्या मार्गाचा प्रस्ताव महापालिकेकडे प्राप्त झाला असून, या मार्गाचा डीपीआर तयार करण्यास हरकत नसल्याचे महापालिकेने महामेट्रोला पत्राद्वारे कळविले आहे. महामेट्रोकडून प्रथम व्यवहार्यता (फिजिबिलिटी) तपासून त्यानंतर डीपीआर तयार करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

पुणे शहराचा सर्वंकष गतिशीलता आराखडा (कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन-सीएमपी) महामेट्रोकडून तयार केला आहे. त्यामुळे वाकड-कात्रज-शेवाळेवाडी हा मार्ग सीएमपीमध्ये समाविष्ट होऊ शकतो का, याचाही विचार होणार आहे.

प्रवासी संभाव्यता, अंदाजित खर्च, भूअर्जन, पर्यावरणीय परिणाम तसेच विद्यमान वाहतूक व्यवस्थेवरील परिणाम यांचा सखोल अभ्यास आवश्यक असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. सीएमपीमध्ये समावेश व्यवहार्य ठरल्यासच पुढे स्थळ पाहणी, प्राथमिक सर्वेक्षण आणि त्यानंतर डीपीआरची प्रक्रिया सुरू होईल.

या सर्व टप्प्यांनंतर संबंधित प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर मांडला जाणार आहे. शहराच्या विकास आराखड्यात किंवा वाहतूक धोरणात बदल करायचा असल्यास जीबीची मान्यता आवश्यक असते. त्यामुळे हा प्रकल्प प्रशासकीय प्रक्रियेबरोबरच राजकीय चर्चेचाही विषय ठरणार आहे.

पुण्यातील मेट्रो स्थानकांभोवती निर्माण झालेल्या पार्किंगच्या प्रश्नावर लवकरच तोडगा निघण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. प्रवाशांना स्थानकांच्या परिसरात दुचाकी व चारचाकी वाहने उभी करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. ही अडचण दूर करण्यासाठी पुणे महापालिकेने ठोस पावले उचलली असून, शहरातील 34 अमेनिटी स्पेसपैकी 31 ठिकाणी पार्किंग सुविधा करण्याचा आराखडा पुढे येत आहे.

शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात आली. सध्या महा मेट्रोमार्फत वनाज ते रामवाडी आणि पीसीएमसी ते स्वारगेट हे दोन मार्ग प्रवाशांसाठी सुरू आहेत. शहरात दररोज सुमारे दीड ते दोन लाख प्रवासी मेट्रोचा वापर करत आहेत. पीएमआरडीएमार्फत हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. तोही लवकरच प्रवाशांसाठी खुला होऊ शकतो.

मेट्रो प्रवाशांची संख्या वाढवायची असेल, तर स्थानकांभोवती पुरेशी पार्किंग व्यवस्था असणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महापालिका आणि महामेट्रो यांच्यात समन्वय साधून उपाययोजना केल्या जात आहेत. महापालिकेच्या प्रकल्प विभागाचे प्रमुख दिनकर गोजारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील 34 अमेनिटी स्पेसचा मेट्रो पार्किंगसाठी वापर करता येईल का, याचा अभ्यास करण्यात आला. त्यानुसार मेट्रो स्थानकांच्या 500 मीटर परिघातील (टीओडी क्षेत्र) 31 जागा पार्किंगसाठी उपयुक्त ठरू शकतात, असे निष्पन्न झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT