Newborn Baby Pudhari
पुणे

Medical Negligence: वाघोलीत धक्कादायक आरोप! डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसूतीदरम्यान नवजात बाळाचा मृत्यू

सीझेरियन शस्त्रक्रियेला झालेल्या कथित विलंबामुळे बाळाचा जीव गेल्याचा आरोप; पोलिस आणि आरोग्य विभागाकडून चौकशी सुरू

पुढारी वृत्तसेवा

वाघोली: केसनंद येथील शाश्वत रुग्णालयात प्रसूतीदरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी प्रसूती झालेल्या महिलेचे पती राकेश मोझे यांनी वाघोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना २१ जून रोजी घडली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दीपाली राकेश मोझे या गेल्या सात महिन्यांपासून संबंधित रुग्णालयात गर्भावस्थेतील उपचार घेत होत्या. २१ जून रोजी पहाटे ५.३० वाजता प्रसूतीकळा सुरू झाल्यानंतर त्यांना शाश्वत रुग्णालयात दाखल करण्यात आले. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पाण्याची पिशवी फुटल्यानंतर त्यांना तीव्र वेदना होऊ लागल्या. सुरुवातीला डॉक्टरांनी नैसर्गिक प्रसूतीचा प्रयत्न केला. मात्र, ती शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर सीझेरियन शस्त्रक्रिया करावी लागेल, असे सांगून त्यांच्या पतीची संमती घेण्यात आली. मात्र, सीझेरियनसाठी आवश्यक तयारी करण्यात आली नव्हती, असा आरोप तक्रारीत केला आहे.

प्रसूतितज्ज्ञ आणि भूलतज्ज्ञ डॉक्टरांना ऐनवेळी बोलावण्यात आले. मात्र, संबंधित डॉक्टर वेळेत उपलब्ध न झाल्याने तब्बल एक ते दीड तास विलंब झाला. या काळात गर्भाशयाची पिशवी फुटून प्लेसेंटल एब्रप्शन झाल्याने बाळाच्या नाका-तोंडात रक्त जाऊन ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला, असा दावा तक्रारदारांनी केला आहे.

त्यानंतर सीझेरियनद्वारे बाळाचा जन्म झाला. मात्र, बाळामध्ये कोणतीही हालचाल नसल्याने त्याला तातडीने पुण्यातील एका रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णवाहिकेत बाळासोबत वडिलांना बसण्यास परवानगी देण्यात आली नसल्याचा आरोपही केला आहे. पुण्यातील रुग्णालयात डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केले. त्यानंतर बाळावर पुण्यातच अंत्यसंस्कार करण्यात आले.

घटनेबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांना रुग्णालयातील डॉक्टरांनी बाहेरील व्यक्तींना बोलावून दमदाटी केल्याचाही आरोप तक्रार अर्जात करण्यात आला आहे. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

वाघोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड म्हणाले, तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. संबंधित सर्वांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर प्रकरण आरोग्य विभागाच्या तज्ज्ञ समितीकडे पाठविण्यात येईल. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, तर हवेली तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश गोरे यांनी सांगितले की, या प्रकरणाची ऑनलाइन तक्रार प्राप्त झाली असून, त्याबाबत चौकशी करण्यात येणार आहे.

दरम्यान, शाश्वत रुग्णालयाच्या संचालकांशी संपर्क केला असतात होऊ शकला नाही. राकेश मोझे यांनी "डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आमच्या बाळाचा जीव गेला असून, आम्हाला न्याय मिळावा," अशी मागणी केली आहे. प्रकरणाची चौकशी सुरू असून, आरोग्य विभागाच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT