वाघोली: पुणे-नगर महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक आणि नागरिक त्रस्त झाले असताना महामार्गालगत मोठ्या प्रमाणात टाकण्यात आलेल्या राडारोड्यामुळे कोंडीत आणखी भर पडत आहे. वाहतूक पोलिस वाहतुकीचे नियमन करीत आहेत. मात्र, रस्त्यावर पसरलेल्या राडारोड्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे.
मागील काही दिवसांपासून नगर महामार्गालगतच्या पदपथावर तसेच वाघोली-केसनंद राज्यमार्गावर राडारोडा पडून असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. केसनंद चौकात महामार्ग खोदून केबल टाकण्याचे काम करण्यात आले असून, खोदकामातून निघालेला राडारोडा वाघोली पोलिस स्टेशनजवळील पदपथावर टाकण्यात आला आहे. त्यामुळे हा राडारोडा महामार्गावर पसरून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे पादचाऱ्यांना, विशेषतः लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांना पदपथ वापरणे अशक्य झाले असून, त्यांना जीव धोक्यात घालून महामार्गावरून चालावे लागत आहे.
त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. राडारोडा तत्काळ उचलून रस्ता व पदपथ मोकळे करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त संजय पोळ यांच्याशी संपर्क साधला असता राडारोडा लवकरच उचलण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. मात्र, राडारोडा टाकणाऱ्यांवर प्रशासन कारवाई कधी करणार? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.