दीपक नायक
वाघोली: गेल्या काही वर्षांपासून वाघोली-केसनंद रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. या रस्त्याच्या कामासाठी प्रशासनाला वारंवार निवेदने देऊन आणि आंदोलने करूनही अद्याप दखल घेण्यात आली नाही. अधिकारी केवळ पाहणी करीत असून, खड्डे बुजविल्याशिवाय काम होत नाही. या रस्त्यालगत ‘केसंनद रोडच्या समस्या सुटणार का?’ अशा आशयाचा फलक लावून नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
वाघोली-केसनंद हा रस्ता थेऊर मार्गे सोलापूरला जोडणारा महत्त्वाचा राज्य मार्ग असल्याने त्यावर नागरिकांसह वाहनांची नेहमीच वर्दळ असते. मात्र गेली अनेक वर्षांपासून या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. (Latest Pune News)
ठिकठिकाणी पडलेले खड्डे, तसेच पावसाळी वाहिन्या आणि ड्रेनेज लाईनअभावी रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार या रस्त्यावर दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असल्याने परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी नागरिकांनी आंदोलने केली आहेत. तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदनेही दिली आहेत. मात्र अद्यापही या रस्त्याचा प्रश्न सुटला नाही.
केवळ खड्डे बुजवून ‘आम्ही समस्या सोडवण्यात अग््रेासर’ असल्याचे दाखवण्यासाठी सोशल मीडियावर रील्स टाकून स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या स्थानिक नेत्यांवर नागरिकांचा रोष वाढला आहे. यामुळे या रस्त्यालगत ठिकठिकाणी ‘केसनंद रोडच्या समस्या सुटणार का?’ अशा आशयाचे फलक लावून प्रशासनाचे या रस्त्याच्या समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
याबाबत नगररोड क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त शीतल वाकडे म्हणाल्या की, हा रस्ता, पावसाळी वाहिन्या आणि ड्रेनेज लाईनचा प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच प्रयत्न केले जातील.
ओढे-नाले नेमके गेले कुठे?
ड्रेनेज लाईनअभावी आयव्ही इस्टेट परिसरातील पाणी मोकळ्या जागेतून केसनंद रस्त्यावर सोडले जात आहे. त्यामुळे घरांसह दुकानात पाणी शिरत असल्याने नागरिक आणि व्यावसायिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. परिसरातील ‘नैसर्गिक ओढे-नाले गेले कुठे’, असा सवाल उपस्थित केला जात आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. यामुळे नागरिकांकडून प्रशासन आणि स्थानिक नेत्यांविरोधात रोष व्यक्त होत आहे.
या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी होत आहे. पावसाचे पाणी आणि सांडपाणी तुंबत असल्याने वाहनचालक आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने तत्काळ गांभीर्याने लक्ष देऊन या रस्त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.- चेतन जगताप, रहिवासी, केसनंद रोड, वाघोली
वाघोली-केसनंद रस्त्याची दुरवस्था झाली आहे. विशेषतः कोणार्क व इपिक सोसायटीसमोर पडलेल्या खड्ड्यांमुळे या रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे.- सुभाष कोलते, अध्यक्ष, कोणार्क ओॲसिस सोसायटी, वाघोली