

पुणे: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे राबविल्या जाणाऱ्या बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या चौथ्या फेरीचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना 23 ते 28 सप्टेंबर या कालावधीत नव्याने प्रवेशनोंदणी करता येणार आहे. चौथी फेरी संपण्यासाठी जवळपास दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे संपूर्ण प्रवेशप्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सीईटी सेलने दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना प्रवेश नोंदणीसाठी 28 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे अद्याप प्रवेशासाठी नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांनी आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे. तर, यापूर्वी पार पडलेल्या तीन फेऱ्यांमध्ये प्रवेश निश्चित झालेल्या नऊ हजार 25 विद्यार्थ्यांना जवळपास दीड महिना ताटकळत बसावे लागणार आहे. (Latest Pune News)
बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमा साठी सीईटी सेलकडून 7 आणि 8 एप्रिल रोजी प्रवेश परीक्षा घेण्यात आली. यंदा बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी 15 हजार 760 जागा उपलब्ध आहेत. या जागांवर प्रवेश मिळविण्यासाठी राज्यभरातून 47 हजार 501 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
त्यापैकी 43 हजार 191 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली होती. त्यापैकी फक्त 14 हजार 167 विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज दाखल केले आहेत. तिसऱ्या फेरीपर्यंत राज्यातील 15 हजार 760 जागांपैकी 9 हजार 25 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. सीईटी कक्षाने ही प्रवेश प्रक्रिया 25 जुलै रोजी सुरू केली.
या अभ्यासक्रमाची तिसरी फेरी 15 सप्टेंबरला पूर्ण झाली. त्यानंतर ही प्रवेश प्रक्रिया पुन्हा थांबवली. तिसऱ्या फेरीपर्यंत अर्ज दाखल केलेल्या 14 हजार 167 विद्यार्थ्यापैकी 9 हजार 25 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. आता चौथ्या फेरीसाठी 6 हजार 735 जागा उपलब्ध असून, 5 हजार 142 विद्यार्थ्यांचे प्रवेश होणे बाकी आहेत. अर्ज दाखल केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 5 हजार 142 विद्यार्थी अद्यापही प्रवेशाच्या प्रतीक्षेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.