School Bus Drunk Driving Pudhari
पुणे

Wagholi School Bus Drunk Driving Case: वाघोलीत मद्यधुंद कारचालकाचा थरार; अनेक वाहनांना धडक

बाईफ रोडवर आठवडाभरात गुन्ह्यांची मालिकाच, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

वाघोली: बाईफ रोड येथे स्कूल बसचालकाने मद्यधुंदावस्थेत स्कूल बस चालवून एका चारचाकी व तीन दुचाकींना फरफटत नेल्याची घटना ताजी असतानाच कारचालकाने देखील मद्यधुंदावस्थेत भरधाव कार चालवून इतर कार, दुचाकीला धडक दिली. बाईफ रोड परिसरात मुळीक सोसायटीसमोर शुक्रवारी (दि. 30) रात्री ही घटना घडली. याप्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मद्यधुंदावस्थेत स्कूल बस चालवून रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या कारचालकाला धडक देऊन दुचाकींना फरफटत नेल्याची घटना बुधवारी (दि. 28) दुपारी घडली होती. या वेळी नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. बसचालक दत्ता वसंत रसाळ (रा. वाघोली) याच्यावर वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना ताजा असतानाच बाईफ रोड येथे पुन्हा कारचालकाचा थरार समोर आला असून, मद्यधुंदावस्थेत भरधाव कार चालवून रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या कारला समोरून जोराची धडक दिली. त्यानंतर पुन्हा समोरून आलेल्या दुसऱ्या कारला जोराची धडक दिली.

या कारची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीचालक जखमी झाला. कारचालक पुन्हा वेडीवाकडी कार चालवीत असताना नागरिकांनी आरडाओरडा करून कार अडवली. चालकाला पोलिसांच्या हवाली करण्यात आले असून, दुचाकी चालकाने फिर्याद दिली. त्यानुसार कारचालक रजनीकांत श्रीनिवास उपाध्याय (रा. वाघोली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाढत्या गुन्ह्याने बाईफ रोड चर्चेत

बाईफ रोडवरील सोसायटीमध्ये मित्रांनीच मित्राचा केलेला खून, त्याचबरोबर आईने मुलाचा गळा चिरून केलेला खून तसेच मुलीच्या खुनाचा प्रयत्न, स्कूल बसचालकाचा थरार, आरएमची चौकातील मारामारी, बाईफ रोड परिसरातील व्यक्तीच्या 60 लाखांच्या ऑनलाइन फसवणुकीबाबत दाखल गुन्हा, कारचालकाचा थरार या एकामागे एक घटना आठवडाभरात घडत गेल्या असल्याने सध्या बाईफ रोड वाघोलीत चर्चेचा विषय ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT