पुणे: महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची लाट असताना फुलेनगर-नागपूर चाळ या प्रभाग क्र. 2 मधून राष्ट्रवादी काँग््रेासचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांना त्यांचा गड राखण्यात यश मिळाले. या प्रभागातून राष्ट्रवादीचे चारही उमेदवार विजयी झाले. त्यामुळे शहरात एकीकडे पक्षाची पीछेहाट होत असताना चार जागांवर मिळालेला विजय वडगाव शेरी मतदारसंघात राष्ट्रवादीला दिलासा देणारा ठरला आहे.
प्रभाग क्र. 2 मधून राष्ट्रवादीचे सुहास टिंगरे, नंदिनी धेंडे, शीतल सांवत आणि रवी टिंगरे हे चार उमेदवार विजयी झाले. सोसायटी आणि झोपडपट्टी वर्ग, असा संमिश्र लोकवस्ती असलेला हा प्रभाग आहे. 2017 च्या महापालिका निवडणुकीत या ठिकाणी भाजप-रिपाइंचे तीन, तर राष्ट्रवादी काँग््रेासचा एक, असे चार नगरसेवक होते. नव्या प्रभागरचनेत हा प्रभाग पूर्वीप्रमाणेच कायम राहिला. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी मोठे आव्हान होते. मात्र, निवडणूकीपूर्वीच सावंत यांनी राष्ट्रवादीला साथ दिली, तर माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी निवडणूक जाहीर झाल्यावर राष्ट्रवादीसमवेत जाण्याचा निर्णय घेतला.
महिला आरक्षणामुळे त्यांच्या पत्नी नंदिनी यांना उमेदवारी मिळाली, तर सुनील टिंगरे यांच्या जागी बंधू सुहास टिंगरे यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे या प्रभागातील राजकीय समीकरणे बदलली. राष्ट्रवादीचे पॅनल मजबूत झाल्याने भाजपकडून कोण निवडणुकीत उतरणार, याबाबत उत्सुकता होती. राजकीय समीकरणे लक्षात घेता भाजपमधील प्रबळ दावेदारांनी माघार घेतली. त्यामुळे भाजपकडून राहुल जाधव, पूजा मोरे-जाधव, चलवादी आणि रिपाइंतून सुधीर वाघमोडे यांना उमेदवारी मिळाली.
मात्र, मोरे-जाधव यांचा उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय झाल्याने भाजपने अदिती बाबर यांना पुरस्कृत केले. मोरे-जाधव यांच्या उमेदवारीच्या माघारी प्रकरणामुळे हा प्रभाग चर्चेत आला. तर काँग््रेासकडून प्रियंका रणपिसे, शिवानी माने, कनहर खान आणि शिवसेना (उबाठा)चे सुनिल गोगले हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. निवडणुकीत भाजपने प्रभागातील समस्यांवरून राष्ट्रवादीला टार्गेट करण्याचे काम केले. राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी मात्र केलेल्या विकासकामांवर प्रचारात भर दिला.
या निवडणुकीत टिंगरेंना प्रभागातच धूळ चारून विधानसभेची गणिते सोपी करण्याची रणनीती भाजपने आखली होती. मात्र, स्वत: टिंगरे यांच्यासह माजी उपमहापौर डॉ. धेंडे, अजय सावंत यांनी ही निवडणूक हातात घेतल्याने राष्ट्रवादीचा विजय सुकर झाला. रिपाइंचे वाघमोडे यांचा अवघ्या 138 मतांनी झालेला पराभव चर्चेला ठरला. काँग््रेास व शिवसेनेच्या उमेदवारांनी प्रत्येकी 3 हजारांपेक्षा अधिक मते घेतली.