Wadgaon Maval: Murder of Mathadi Mukadam in Brahmanwadi 
पुणे

वडगाव मावळ : ब्राह्मणवाडीत माथाडी मुकादमाचा खून

backup backup

वडगाव मावळ : पुढारी वृत्तसेवा : नियमाप्रमाणे रक्कम न घेता वाढीव रक्कम घेत असल्याचा राग मनात ठेवून माथाडी मुकादमाची बीअरची बाटली डोक्यावर, छातीवर, पायावर फोडून खून केल्याचा प्रकार साते गावच्या हद्दीत बोर्‍हाडेवस्तीसमोर घडला.

दरम्यान, वडगाव मावळ पोलिसांनी काही तासांतच तीन जणांना अटक केली आहे. वडगाव न्यायालयाने त्यांना 21 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

ज्ञानोबा पांडुरंग मुजुमले (वय 55, रा. कोंढणपूर, ता. हवेली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी रणजित राजेंद्र देशमुख (वय 24), सचिन रमेश बंदीछोडे (वय 20) व ऋतिक सोमनाथ डोंगरे (21 तिघेही रा. वडगाव मावळ) अशी आरोपींची नावे आहेत.

बुधवारी (दि. 16) रात्री बोर्‍हाडेवस्ती समोर पवना बंदिस्त जलवाहिनीच्या ठेवलेल्या पाईपजवळ ही घटना घडली. दरम्यान, आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून गेले होते.

पोलिस निरीक्षक विलास भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत ज्ञानोबा मुजुमले हे चिंचवड येथील टाटा कंपनीमध्ये माथाडी मुकादम होते. आरोपी रणजित देशमुख यास मेघना कंपनीकडून टाटा मोटर्स कंपनीला माल पोहोचविण्याचे ट्रान्सपोर्टचे काम मिळाले होते.

मुजुमले हे माथाडी कामगारांच्या नियमापेक्षा जास्त रक्कम घेत होते. त्यामुळे आरोपी रणजित देशमुख यांनी रक्कम कमी करण्याची विनंती केली होती. परंतु, मुजुमले हे रक्कम कमी करण्यास तयार नव्हते.

आरोपी रणजित देशमुख याने महिन्याला एकरकमी दोन लाख रुपये देण्याचा प्रस्ताव दिला होता. यावर मुजुमले यांनी विचार करून सांगतो, असे सांगितले होते. दरम्यान, बुधवारी (दि. 16) सायंकाळी साढेपाच वाजता आरोपी रणजित देशमुख, सचिन बंदीछोडे व ऋतिक डोंगरे हे मुजुमले यांना केएसबी चौक येथे भेटले व लोणावळा येथे पार्टी देतो, असे सांगून आरोपी देशमुख हा त्यांच्याच गाडीत तर आरोपी बंदीछोडे व डोंगरे हे दुसर्‍या गाडीने आले.

साते गावच्या हद्दीत बोर्‍हाडेवस्ती सामोर धनंजय नवलाखा यांच्या मिळकतीमध्ये पवना बंदिस्त जलवाहिनीच्या लोखंडी पाईप ठेवलेल्या ठिकाणी मुजुमले यांना घेऊन जाऊन आरोपींनी त्यांना दारू पाजली.

येथे माथाडी कामगारांच्या रक्कमेवरून आरोपी रणजित देशमुख व ज्ञानोबा मुजुमले यांच्यात भांडण झाले. त्यावेळी आरोपींनी मयताच्या डोक्यात दगड घालून आणि बाटली फोडून खून केला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक संतोष चामे, विकास सस्ते, हवालदार मनोज कदम, श्रीशल कंटोळी, भाऊसाहेब खाडे आदींनी धाव घेतली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके, उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, संतोष चामे, विकास सस्ते, कर्मचारी प्रकाश येवले, मनोज कदम, श्रीशल कंटोळी, भाऊसाहेब खाडे, अमोल कसबेकर आदींनी सूत्रे फिरवून आरोपींना अटक केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT