Pune RMC Plants Pudhari
पुणे

Wadgaon Khurd RMC Plant: पुण्यातील वडगाव खुर्दमध्ये आरएमसी प्लांटचा त्रास; कारवाई वारंवार रद्द होत असल्याने नागरिक आक्रमक

धूळ आणि ध्वनिप्रदूषणामुळे रहिवासी हैराण; रास्ता रोको आंदोलनासह एनजीटीत याचिका दाखल करण्याची तयारी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: धूळ, ध्वनिप्रदूषण आणि रात्रभर सुरू राहणाऱ्या आरएमसी प्लांटच्या त्रासाने वडगाव खुर्दमधील नागरिक हैराण झाले आहेत. अनधिकृत प्लांटवर कारवाईचे नियोजन करून, पोलिस बंदोबस्ताची तयारी असतानाही ऐनवेळी मोहीम रद्द होत असल्याने महापालिका प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. राजकीय दबावामुळे कारवाई थांबवली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. आता रहिवाशांनी कृती समिती स्थापन केली असून, रास्ता रोको आंदोलन आणि राष्ट्रीय हरित लवादात (एनजीटी) याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.

पुणे महापालिका हद्दीत सुमारे १०० ते १२५ आरएमसी प्लांट असल्याचा अंदाज आहे. या प्लांटमधून होणारे धूलिप्रदूषण आणि ध्वनिप्रदूषण यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा तसेच पर्यावरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्लांटच्या परवानग्यांबाबतही प्रश्न उपस्थित होत असून, अनधिकृत व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

काही महिन्यांपूर्वी खांदवे-खांदवेनगर परिसरातील सात आरएमसी प्लांटवर महापालिकेने कारवाई केली होती. त्यानंतर वडगाव खुर्दमधील नदीकाठच्या आणि परिसरातील प्लांटवर कारवाईचे नियोजन करण्यात आले. मात्र, एका आमदाराच्या कथित दबावामुळे मोहीम थांबविण्यात आल्याचा आरोप आहे. संबंधित लोकप्रतिनिधींची भूमिका याबाबत समोर आलेली नाही.

मागील आठवड्यात बावधन बुद्रुकमधील पाच अनधिकृत प्लांटवर कारवाई झाली. त्यामुळे वडगाव खुर्दमध्येही कारवाई होण्याची अपेक्षा होती. सोमवारी पहाटेच्या मोहिमेसाठी पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला होता. तरीही कारवाई रद्द झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

कृती समितीचा आंदोलनाचा इशारा

प्रेयेझा सिटीसह परिसरातील विविध सोसायट्यांमधील नागरिकांनी एकत्र येत कृती समिती स्थापन केली आहे. वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने रास्ता रोको आंदोलन आणि महापालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात एनजीटीत याचिका दाखल करण्याच्या हालचाली सुरू आहेत. कारवाई वारंवार का रद्द होते, याचे स्पष्टीकरण प्रशासनाने द्यावे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नात राजकीय हस्तक्षेप झाला आहे का? याची चौकशी करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT