पुणे/खडकवासला: प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त शनिवारी भक्तीचा उत्सव रंगला. दिवसभर सुरू असलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे मंदिर परिसर श्रीविठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून गेला होता. श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली.
दर्शन, नामस्मरण, महाप्रसाद आणि विविध धार्मिक उपक्रमांचा लाभ घेत भाविकांनी आषाढी एकादशी भक्तिभावाने साजरी केली. पहाटे मंदिराचे मानकरी असलेल्या गोसावी कुटुंबातील राहुल गोसावी आणि आरती गोसावी यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी यांची महापूजा करण्यात आली.
दिवसभर श्रीविठ्ठलनामाच्या जयघोषाने मंदिरात परिसर दुमदुमून गेला होता. पूजा, आरती, हरिनामाच्या गजरासह विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे मंदिर परिसर दिवसभर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. पूजा, आरती, हरिनामाचा गजरासह विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे मंदिर परिसर भक्तिरसात नाऊ निघाल्याचे चित्र या वेळी दिसून आले.
भाविकांनी विठुमाऊलीच्या चरणी नतमस्तक होत सुख-समृद्धीची प्रार्थना केली. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि सेवाभावी संघटनांच्या वतीने भाविकांसाठी फराळ, उपवासाची खिचडी तसेच तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात आले. स्वयंसेवकांनी दर्शन व्यवस्थापन, महाप्रसाद वितरण आणि भाविकांच्या सुविधांसाठी उत्स्फूर्तपणे सेवा बजावली.
सकाळपासून सुरू झालेली भाविकांची गर्दी रात्रीपर्यंत कायम होती. आषाढी एकादशीच्या निमित्ताने महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या के. बी. जोशी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या वतीने 'सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा' हा जनजागृती उपक्रमही राबविण्यात आला.