

पुणे: राजकोट (गुजरात) येथील धान्य व्यापाऱ्याचे बँक खाते ऑनलाइन व्यवहारातून फ्रीज करून स्वतःला 'रॉ' अधिकारी असल्याची बतावणी करत, खाते सुरू करून देण्याच्या मोबदल्यात लाखो रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी एका ४२ वर्षीय व्यापाऱ्याने पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दिली. त्यानुसार परेश प्रवीण कोठारी( रा. हॉटेल पंचमी, सातारा रस्ता) याच्याविरोधात पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. खंडणी विरोधी पथकाने त्याला खंडणीची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ मार्च रोजी रात्री फिर्यादी यांच्या बँक ऑफ बडोदा, राजकोट येथील खात्यात वेगवेगळ्या खात्यांमधून एक हजारांचे दोन आणि दोन हजारांचे एक असे एकूण तीन ट्रान्सजॅक्शनमधून ४ हजार ऑनलाइन जमा झाले. त्यानंतर त्यांचे खाते फ्रीज केले. बँकेत चौकशी केल्यानंतर हे पैसे धनकवडी परिसरातील प्रवीण कोठारी आणि पुष्पा कोठारी यांच्या खात्यांमधून आल्याची माहिती मिळाली. यानंतर संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता, समोरच्या व्यक्तीने व्हॉट्सॲप कॉलद्वारे स्वतःला 'रॉ अधिकारी' असल्याचे सांगितले.
त्याने अनेक लोकांची खाती अशाच प्रकारे फ्रीज केल्याचा दावा करत खाते सुरू करण्यासाठी सुरुवातीला ५ लाखांची मागणी केली. तडजोडीअंती ही रक्कम सव्वाचार लाखांवर निश्चित करण्यात आली. पैसे न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही दिली. यानंतर तक्रारदाराने जून महिन्यात सातारा रोडवरील सिटी प्राईडजवळील कॅफे कॉफी डे येथे संबंधित व्यक्तीची भेट घेतली. त्या वेळी त्याने 'पोलिस मित्र' असे लिहिलेले ओळखपत्र दाखवून त्यावर परेश कोठारी असे नाव असल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. बैठकीत पुन्हा खाते सुरू करण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. दरम्यान, फिर्यादीने वकिलांचा सल्ला घेत १३ जुलै रोजी गुन्हे शाखेकडे तक्रार दिली. त्यानंतरही संबंधिताकडून व्हॉट्सॲप संदेश व फोनद्वारे धमक्या आल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. संबंधित व्हॉट्सॲप चॅट, ऑडिओ रेकॉर्डिंग आणि अन्य पुरावेही फिर्यादीने पोलिसांकडे दिले होते.
असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात
तक्रार दाखल होताच खंडणी विरोधी पथकाने तपासाला सुरुवात केली. चौकशीत परेश कोठारी खंडणी मागत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी शुक्रवारी (दि.२४) सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास सातारा रोड येथील पंचमी चौक परिसरात सापळा लावला. परेश हा खंडणीची रक्कम घेण्यासाठी आला असताना, त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. सध्या तो पर्वती पोलिसांच्या ताब्यात आहे. परेश यानेच एका गुंतवणुकीच्या संदर्भातील संकेतस्थळावरून फिर्यादीच्या बँक खात्यात पैसे पाठवले होते. त्यानंतर त्याने सायबर पोलिसांकडे तक्रार देऊन त्यांचे खाते फ्रिज करण्यास भाग पाडले. यानंतर त्याच आधारे फिर्यादीला ब्लॅकमेल करून खंडणीची मागणी केल्याचे पोलिसांनी सांगितले.