विसर्जन मिरवणूक निघणार वाजतगाजत; तयारी पूर्ण Pudhari
पुणे

Pune Ganesh Visarjan: पुण्यात विसर्जनाची तयारी पूर्ण, कोणता गणपती किती वाजता निघणार? संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Pune Visarjan Start Timing: मानाचे आणि प्रमुख गणपती निघणार थाटात; यंदा एक तास आधी प्रारंभ

पुढारी वृत्तसेवा

Pune Ganpati Visarjan 2025

पुणे: सनई - चौघड्याच्या सुरावटीत... ढोल-ताशाच्या निनादात आणि “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”च्या जयघोषात उद्या शनिवारी (दि. 6) पुण्यातील मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांच्या गणेश विसर्जन मिरवणूक वाजतगाजत निघणार असून, मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांच्या वतीने यंदा विविध संकल्पनेप्रमाणे देखणे रथ तयार करण्यात आले आहेत.

दरवर्षी सकाळी 10.30 मिरवणुकीला सुरुवात होते, यंदा एक तास आधी म्हणजेच सकाळी साडेनऊ वाजता मिरवणुकीला सुरुवात होणार असून, पुण्याची देदीप्यमान मिरवणुकीची परंपरा यंदाही कायम राहणार आहे. राज्य शासनाने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अमाप उत्साह आहे. (Latest Pune News)

शनिवारी (दि.6) दिमाखात आणि जल्लोषात पुण्यातील श्रीगणेश विसर्जन मिरवणूक निघणार आहे. रांगोळ्यांच्या मनोहारी पायघड्या, फुलांनी सजविलेल्या रथात विराजमान झालेले बाप्पा, ढोल-ताशांचा निनाद, बँड पथकांचे उत्कृष्ट वादन, जनजागृतीपर देखावे अशा थाटात मिरवणूक काढली जाणार आहे. शनिवारी अनंत चतुर्दशीला सकाळी साडेनऊ वाजता महात्मा फुले मंडईतून मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.

चांदीच्या पालखीतून तसेच आकर्षक रथातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. आहे. श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट, श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट, गुरुजी तालीम मंडळ, श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट , केसरीवाडा गणपती या मानाच्या पाच गणपतींसह अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट या प्रमुख गणपती मंडळांची वैभवशाली मिरवणूक पुणेकरांना पाहता येणार आहे. एकूणच भावपूर्ण वातावरणात बाप्पाला निरोप दिला जाणार आहे.

श्री कसबा गणपती मंडळ : सकाळी नऊला सुरुवात

विसर्जन मिरवणुकीला सकाळी साडेनऊ वाजता सुरुवात होणार आहे. मंडळाची श्रीगणेशाची मूर्ती ही चांदीच्या पालखीत खांद्यावर घेऊन भाविक तसेच सनईवादक प्रमोद गायकवाड आणि चौघडावादक देवळणकर यांच्या सुस्वरात सनई चौघडा, प्रभात बँड, विशेष मुलांची कामायनी शाळा, श्री जयती गजानन रथ यासोबतच ढोल-ताशा पथके आणि प्रबोधनात्मक संदेश देणारे भक्त सहभागी होणार आहेत.

श्री तांबडी जोगेश्वरी : चांदीची पालखी

दरवर्षीप्रमाणे पारंपरिक पद्धतीने गणरायाची मिरवणूक पालखीतून निघणार असून, अब्दागिरी, मानचिन्हासह श्री गणराय विराजमान असलेली चांदीची पालखी कार्यकर्ते स्वत: आपल्या खांद्यावरून वाहून मिरवणुकीत सहभागी होतील. नगरावादन आणि ढोल-ताशा पथके मिरवणुकीत सहभागी होतील.

गुरुजी तालीम : फुलांनी सजवला रथ

सकाळी साडेनऊ वाजता मंडळाच्या मिरवणुकीला सुरुवात होणार असून, हर हर महादेव या फुलांनी सजविलेल्या रथावर गणराय विराजमान होणार आहेत. स्वप्निल सरपाले, सुभाष सरपाले यांनी हा रथ साकारला आहेत. नगारावादन आणि ढोल-ताशा पथकांचा सहभाग मिरवणुकीत असणार आहे.

श्री तुळशीबाग : मयूर रथ साकारला

शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा करणार्‍या श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट या मानाच्या चौथ्या गणपती मंडळाने विसर्जन मिरवणुकीसाठी मयूर रथ साकारला आहे. विसर्जन मिरवणुकीला महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून सकाळी साडेनऊ वाजता सुरुवात होणार आहे. मयूर रथात श्रीगणेशाची मूर्ती विराजमान असणार आहेत. मयूर रथावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात येणार असून, हा रथामध्ये हायड्रोलीक पद्धतीचा वापर केला जाणारा आहे. रथाची उंची 35 फूट इतकी आहे. हा रथ 16 फूट रुंद आणि 24 फूट लांब असणार आहे. मिरवणुकीच्या अग्रभागी लोणकर बंधू यांचा नगारा असून, ढोल-ताशा पथके देखील सहभागी होणार आहेत.

केसरीवाडा : पालखीतून बाप्पा निघणार

विसर्जन मिरवणुकीला सकाळी साडेनऊ वाजता महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरुवात होणार आहे. “कथकली मुखवट्याच्या” परंपरेप्रमाणे फुलांनी सजविलेल्या पालखीतून गणरायाची मिरवणूक निघणार असून, मिरवणुकीत श्रीराम, शिवमुद्रा, स्वराज्य ट्रस्ट ढोल-ताशा पथकांचा समावेश असणार आहे. बिडवे बंधूचे नगारावादन, इतिहासप्रेमी मंडळाचा छत्रपती श्रीशिवाजी महाराज समाधी जीर्णोद्धार हा देखावा असणार आहे. ”हरवलेला पोस्टमन” ही स्वराज्य ट्रस्ट ढोल-ताशा पथकाची संकल्पना असणार आहे.

अखिल मंडई मंडळ

विसर्जन मिरवणुकीला शनिवारी सायंकाळी सहा वाजता सुरुवात होणार आहे. यंदाच्या विसर्जन मिरवणूकीसाठी ”श्रीगणेश सुवर्णयान” हा रथ साकारण्यात आला आहे. मंडळाचे यंदा 132 वे वर्ष आहे. श्रीगणेश सुवर्णयानाचे स्वरूप जहाजासारखे असून, रथाचा आकार 25 फूट लांब आणि 16 फूट रुंद असणार आहे. रथावर आकर्षक विद्युत रोषणाई असणार आहे.

जहाजाच्या वर सर्च लाईट असेल. तसेच आकर्षक कंदील लावण्यात येणार आहेत. मिरवणुकीच्या अग्रभागी जयंत नगरकर बंधू यांचे नगारावादन त्यामागे गंधर्व बँड तसेच शिवगर्जना पथकाचे वादन मिरवणुकीत होणार आहे. कलादिग्दर्शक विशाल ताजणेकर यांनी रथ साकारला आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट

विसर्जन मिरवणुकीला शनिवारी सायंकाळी चार वाजता बेलबाग चौकातून सुरुवात होणार आहे. श्री गणनायक रथामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत. आकर्षक विद्युतरोषणाईने हा रथ उजळून निघणार आहे. दक्षिण भारतीय शैलीतील रथाची निर्मिती करण्यात आली आहे.

मिरवणुकीत मानवसेवा रथ आणि त्यामध्ये सनई-चौघडा अग्रभागी असणार आहे. मिरवणुकीत स्वरूपवर्धिनीचे पथक, केरळचे चेंदा मेलम पथक असा लवाजमा असेल. तसेच पुरुष भाविकांसह महिला गणेशभक्त देखील मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा मिरवणुकीत सहभाग असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT