

पुणे: शहरातील पारंपरिक गणेशोत्सव मोठ्या उत्साह शिगेला पोहचला असताना आता विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. दि. 6 व 7 सप्टेंबर या दोन दिवशी मिरवणुकीच्या मार्गावर वाहतूक व्यवस्था बदलली असून, स्थानिक व वाहतूक पोलिसांनी संयोजन साधून सुरक्षेची पक्की तयारी केली आहे. या वेळी शहरातील 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. नागरिकांनी सहकार्य करत पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.
गणेश विसर्जन सोहळ्यानिमित्त उद्या शनिवारी (दि. 6 सप्टेंबर) सकाळी सात वाजल्यापासून वाहतुकीत बदल केला आहे. त्यानुसार लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, केळकर रस्त्यासह प्रमुख 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवले जाणार आहेत. (Latest Pune News)
... हे रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार
शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, गणेश पेठ रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्ता, शास्त्री रस्ता, जंगली महाराज रस्ता (झाशीची राणी चौक ते खंडुजीबाबा चौक), कर्वे रस्ता (नळस्टॉप चौक ते खंडुजीबाबा चौक), ना. गोपाळ कृष्ण गोखले रस्ता (खंडुजीबाबा चौक ते फर्ग्युसन महाविद्यालय प्रवेशद्वार), भांडारकर रस्ता (पीवायसी जिमखाना ते गोखले स्मारक चौक), पुणे- सातारा रस्ता (व्होल्गा चौक ते जेधे चौक), सोलापूर रस्ता (ढोले पाटील चौक- सेव्हन लव्हज चौक ते जेधे चौक), प्रभात रस्ता (डेक्कन पोलिस ठाणे; तसेच शेलारमामा चौक), बगाडे रस्ता (सोन्या मारुती चौक ते फडके हौद चौक), गुरुनानक रस्ता (देवजीबाबा चौक ते हमजेखान चौक ते गोविंद हलवाई चौक).
शहराबाहेर वर्तुळाकार मार्ग: विसर्जन सोहळ्यानिमित्त वाहनचालकांसाठी पर्यायी वर्तुळाकार मार्ग तयार केला आहे. चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. दरम्यान, विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत संबंधित रस्त्यावर दुहेरी वाहतूक सुरू राहणार आहे.
विसर्जन मिरवुणकीच्या अनुषंगाने महत्त्वाचे 17 रस्ते वाहतुकीस बंद केले असून, विविध भागात वाहतूक वळविली आहे. वाहन चालकांसह भाविकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. विसर्जन मिरवणूक शांंततेत पार पाडण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे.
- अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर