

silver demand Ganesh festival
शंकर कवडे
पुणे: गणेशोत्सव म्हटला की, भक्तिभाव, सांस्कृतिक उपक्रम, ढोल- ताशांचे गजर आणि सजावट याशिवाय एक मोठा पैलू म्हणजे बाजारपेठेत होणारी प्रचंड उलाढाल. पुण्यात दरवर्षी दहा दिवसांच्या या उत्सवात कोट्यवधी रुपयांची अर्थचक्रे फिरतात.
त्यामुळे, पुण्याचा गणेशोत्सव हा केवळ आध्यात्मिक किंवा सांस्कृतिक सोहळा नसून, शहराच्या अर्थचक्राला गती देणारा महत्त्वाचा महोत्सव ठरतो. व्यापार्यांपासून कारागिरापर्यंत तसेच लहान- मोठ्या दुकानदारांपासून ई- कॉमर्स कंपन्यांना -हातभार लावणार्या या उत्सवात यंदा तब्बल अडीच हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेची उलाढाल झाली आहे. (Latest Pune News)
सोन्या- चांदीची दरवाढ, पीओपी मूर्तीच्या परवानगीतील विलंबामुळे उत्पादनात झालेली घट आणि रात्री उशिरापर्यंत देखाव्यांस परवानगी दिल्याने जिवंत देखाव्यांचे वाढलेले मानधन ही यातील काही प्रमुख कारणे असल्याचे चित्र आहे.
एकंदरीत पुणेकरांनी गेल्या दहा दिवसांत जवळपास अडीच हजार कोटी रुपयांहून अधिक पैसे मुक्तहस्तपणे खर्च करत गणरायाची मनोभावे सेवा केल्याचे दिसून आले. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या काळात पूजेच्या साहित्यापासून गणेशमूर्ती, सजावट, फुले, दागिने व मिठाईसाठी भाविकांनी मुक्तहस्तपणे कोट्यवधींची उधळण केल्याने शहरातील फुल, नारळ, फळे, मिठाई, विद्युत माळा, सराफा व्यावसायिक, मंडप व्यावसायिक, देखावे तयार करणारे सजावट कारागीरही सुखावल्याचे चित्र आहे.
चांदीला सव्वा लाखाची झळाळी; आभूषणांना मोठी पसंती
लाडक्या गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर पूजेचे साहित्य आणि मूर्तीला चांदीचे अलंकार वाहण्याची क्रेझ कायम आहे. दरवर्षी यामध्ये वाढ होत असल्याचे शहरातील सराफा व्यावसायिकांकडे होत असलेल्या मागणीवरून स्पष्ट होते. गणेशोत्सव काळात यंदा चांदीचा किलोचा दर हा एक लाख 20 हजार रुपये इतका राहिला.
मागील वर्षी तो 75 हजार रुपये इतका होता. दरवर्षीप्रमाणे यंदाही कारागिरांनी आकर्षक डिझाईनमध्ये मोदक, रत्नजडित मुकुट, तोडे, जानवे, मूषक, दुर्वाहार, कडे, बाजूबंद, पानसुपारी, जास्वंदीचा हार, मोत्यांचा हार, त्रिशूळ, सोंडपट्टी, शेला, भीकबाळी, छत्री, उपरणे आदी सोन्या- चांदीमधील आभूषणे घडविली होती.
याखेरीज, बाजारात मिनार असलेले रंगबिरंगी फुले, केवड्याची फुले आणि फळांची परडी अशा चांदीच्या दागिन्यांमध्ये वेगवेगळे प्रकार उपलब्ध झाले होते. यामध्ये चांदीच्या दुर्वांना सर्वाधिक मागणी राहिली. त्यामुळे गणेशोत्सवात चांदीच्या विक्रीत तिप्पट ते चौपट वाढ झाली.
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांकडूनही चांदीचे अलंकार सार्वजनिक मंडळांच्या गणपतीला अर्पण करण्याचा कल दिसून आला. याखेरीज मंदिरांमध्येही देणग्या स्वरुपात सोन्या- चांदीची दागिने स्वीकारल्या जाऊ लागल्याने भक्तांचा मोदक, दुर्वा तसेच विविध अलंकार खरेदी करण्याकडे कल होता. वाढलेल्या मागणीमुळे चांदीच्या व्यवसायात कोट्यवधींची उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले.
जाहिराती ठरल्या प्रमुख उत्पन्नाचे साधन
सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करायचा म्हटले की, खर्चही अफाट असतो. मंडप, सजावट, रोषणाई, मिरवणुका, देखावे आदी सगळ्यांसाठी मोठ्या आर्थिक तजवीजीची गरज भासते. त्यामुळे यंदाही मध्यवर्ती भागातील मंडळांना जाहिरातदारांचा मोठा हातभार मिळाला. वर्गणी नेहमीप्रमाणे गोळा केली असली तरी उत्पन्नाचा सिंहाचा वाटा जाहिरातींमधूनच आला.
दरवर्षी जमा होणार्या वर्गणीच्या तुलनेत 70 ते 80 टक्के उत्पन्न जाहीरातींमधून मिळाले. त्यामुळे मंडळांनीही गणरायाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत उत्सव भव्य दिव्य थाटात साजरा केला. मात्र, उपनगरांतील मंडळांची आर्थिक मदार अजूनही प्रामुख्याने वर्गणीदारांवरच अबलंबून राहिली.
शहरातील मंडळांची सरासरी संख्या
नोंदणीकृत मंडळ - 3 हजार 523, नोंदणीकृत मंडळे - जवळपास 3.5 ते 4 हजार, हौसिंग सोसायटीत - जवळपास 15 ते 20 हजार, शाळा व महाविद्यालये - जवळपास 500, ज्येष्ठ नागरिक व नवचैतन्य क्लब- जवळपास 150, अन्य संस्था - 1 हजार मंडळ
(मंडपाचा सरासरी खर्च) :
लहान मंडळ - 75 हजार ते 5 लाख, मध्यम मंडळ - 5 लाख ते 10 लाख, मोठे मंडळ - 10 लाखापासून पुढे
गणपती, गौराईसाठी राज्यासह देशभरातून फळे
प्रतिष्ठापनेवेळी पूजेसाठी लागणार्या पाच फळांसह गौराईच्या फळावळीसाठी बाजारात संत्री, मोसंबी, चिक्कू, पेरू, सफरचंद, केळी यांसह विविध फळांना मोठी मागणी राहिली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यासह हिमाचल प्रदेशमधून गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात मोठ्या प्रमाणात फळांची आवक झाली होती.
प्रतिष्ठापनेसह गौरीपूजन तसेच प्रसादाच्या अनुषंगाने नागरिकांकडून फळांची खरेदी करण्यात आली. या काळात हिमाचल प्रदेशमधून सफरचंदाची सर्वाधिक आवक झाली. त्यापाठोपाठ मोसंबीला सर्वाधिक मागणी राहिली. दहा दिवस चालणार्या उत्सवासाठी सर्वाधिक काळ टिकणार्या फळांना मोठी मागणी राहिली.
गणेशोत्सवादरम्यान शहरात विराजमान झालेल्या गणेशमूर्ती
घरगुती (सुमारे सात लाख) : सार्वजनिक - सुमारे दहा हजार, पीओपी मूर्ती - सहा लाखांहून अधिक, शाडू मूर्ती - सत्तर ते ऐंशी हजारांहून अधिक
दररोज तीन लाखांहून अधिक नारळ
गणेशोत्सवात पूजेसह मोदकासाठी नारळाला मोठी मागणी राहिली. शहरातील गुलटेकडी मार्केटयार्डातील बाजारात दररोज तीन ते चार हजार पोत्यांमधून जवळपास तीन लाखांहून अधिक नारळाची आवक झाली. धार्मिक विधी, तोरण यासाठी तामिळनाडूच्या वाणी अंबाडी भागातून येणार्या नव्या नारळास तर मोदकांसाठी साफसोल व मद्रास नारळास चांगली मागणी आहे.
याखेरीज जिल्ह्याच्या विविध भागातील धार्मिक स्थळांवरूनही नारळांना चांगली मागणी राहिली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर किरकोळ बाजारात 40 रुपयांपासून 60 रुपयांपर्यंत नारळाची विक्री झाली. नारळ (शेकडा दर) : मद्रास- 4 हजार 800 ते 5 हजार, पालकोल - 2 हजार 900 ते 3 हजार, नवा नारळ - 2 हजार 800 ते 3 हजार, साफसोल - 3 हजार ते 5 हजार 600
विद्युत माळा, दिव्यांची आकर्षक रोषणाई
गणेशोत्सवात विद्युत रोषणाई हा सजावटीचा अविभाज्य भाग असल्याने लाइटिंगच्या माळांना मोठी मागणी असते. शहरातील बाजारपेठेत स्वदेशी एलईडी माळांसह चायनामेड लाइटला मोठी मागणी राहिली. दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध प्रकारचे आकर्षक दिवे तसेच विद्युत माळा बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या होत्या.
गतवर्षीपेक्षा यंदा या बाजारपेठा उजळून निघाल्या होत्या. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात करण्याचा चंग बांधल्याने सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात आकर्षक रंगसंगती असलेल्या दिवे, माळांची खरेदी केली. गणरायाच्या आगमनाच्या महिनाभर आधीपासून गौराई आवाहनापर्यंत बाजार गजबजून गेला होता. परिणामी, गतवर्षीच्या तुलनेत यंदा इलेक्ट्रीक वस्तूंचे मार्केटमध्येही मोठ्या प्रमाणात उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले.
फुलबाजारात दहा कोटींहून अधिक रुपयांचे व्यवहार
गणरायाच्या दैनंदिन पूजेवेळी लागणार्या हारासाठी झेंडू, गुलछडी, शेवंती, गुडछडी आणि डच गुलाबाच्या फुलांना शहरातील हार विक्रेत्यांकडून मोठी मागणी राहिली. गेल्या काही वर्षांत डच गुलाबाच्या पाकळ्यांच्या हाराला नागरीकांची मिळत असलेली पसंती यंदाही कायम राहिली.
घरगुती गणपतीसाठी झेंडू, शेवंती, टगर तर मंडळांच्या गणपतीसाठी गुलछडी तसेच डच गुलाबाच्या पाकळ्यांच्या हाराला मोठी मागणी होती. यंदा हारामध्ये कापडी फुले, मोती, मणी यांचाही वापर केल्याचे दिसून आले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुलटेकडी मार्केट यार्डातील फुलबाजारात सर्व प्रकारच्या फुलांची आवक वाढली होती.
मार्केट यार्डातील घाऊक फुलबाजारातील दहा दिवसांतील परिस्थिती : फुले सरासरी दर (प्रतिकिलो) : झेंडू - 10 ते 140 रुपये, शेवंती - 30 ते 300 रुपये, गुलछडी- 80 ते 1500 रुपये, डच गुलाब (गड्डी) - 60 ते 300 रुपये, जुई -1000 ते 1200 रुपये, कन्हेर- 100 ते 350 रुपये