पुणे : विमाननगर परिसरातील रहिवासी गेल्या काही महिन्यांपासून तीव पाणीटंचाईला सामोरे जात आहेत. या परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये चार-चार दिवस नळाला पाणीच येत नाही. आले तरी तेही अत्यल्प दाबाने आणि फक्त एक-दोन तासांसाठीच. त्यामुळे रहिवाशांना पिण्याच्या पाण्याबरोबरच स्वयंपाक, अंघोळ आणि दैनंदिन घरकामांसाठी पाणी मिळत नसल्याने प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, याच परिसरातील फिनिक्स मॉल आणि पंचशील टेकपार्कला मात्र दररोज महापालिकेकडून तब्बल चार ते पाच लाख लिटर पाणी नियमित दिले जात असल्याने नागरिकांमध्ये तीव संतापाची भावना आहे. (Latest Pune News)
विमाननगर परिसरात अनेक सोसायट्या आहेत. गेल्या काही दिवसांत या परिसराचा झपाट्याने विकास झाला आहे. मात्र, या सोसायट्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. येथील एका गृहनिर्माण सोसायटीतील रहिवाशांनी सांगितले की, आमच्या सोसायटीत 300 हून अधिक कुटुंबे राहतात. पण, पाणीपुरवठा रोज होत नाही. त्यामुळे महागड्या टँकरच्या पाण्यावर आम्हाला अवलंबून राहावे लागत आहे. यासाठी महिन्याला हजारो रुपये खर्च होतात. आम्ही कर भरतो, मग आम्हाला आमच्या मूलभूत हक्काचे पाणी का मिळत नाही? अ सा सवाल त्यांनी केला.
या प्रकरणावर सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत भास्कर जगधने यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला निवेदन दिले आहे. ते म्हणाले, ‘पाणी हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत आणि संविधानिक हक्क आहे. व्यावसायिक प्रकल्पांना लाखो लिटर पाणी सहज उपलब्ध करून देणे आणि सामान्य नागरिकांना काही हजार लिटर पाण्यासाठी वंचित ठेवणे हा उघड अन्याय आहे. जर प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही, तर नागरिकांना आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल.’
प्रशासनावर प्रश्नचिन्ह
महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग व्यावसायिक प्रकल्पांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी का व कसे पुरवतो? हे कनेक्शन नियमांनुसार आहेत का? एवढ्या प्रचंड पाण्यामुळे नागरिकांच्या वाट्याला येणारा पुरवठा कमी होतो का? असे प्रश्न आता येथील नागरिकांनी उपस्थित केले आहेत.