पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांची लूटमार सुरू असून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. त्याबाबात प्रशासनाकडे माहिती मागण्यासाठी गेले असता सभापतींसह कामगार व अडते गटाच्या संचालकांनी दादागिरी आणि दमदाटी करून बाजार समितीतून अपमानास्पदरित्या धक्काबुकी करून गुंडाच्या दहशतीखाली बाहेर काढले.
त्यामुळे सभापतींसह संचालक आणि 20 ते 25 गुंड प्रवृत्तीच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच, त्यांपासून जीवाला धोका असल्याने सशस्त्र पोलिस संरक्षण मिळावे, अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांनी पोलिस आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
पोलिस आयुक्तांना दिलेल्या पत्रात सभापती प्रकाश जगताप, अडते गटाचे संचालक अनिरुध्द भोसले आणि गणेश घुले तसेच कामगार गटाचे संचालक संतोष नांगरे यांसह 20 ते 25 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. पोलिस आयुक्तांखेरीज या पत्राची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) आणि पोलिस महासंचालकांनाही यांना पाठविण्यात आली आहे.
पुणे बाजार समितीतील संचालक मंडळाच्या ठरावांची माहिती घेण्यासाठी लवांडे हे काही शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत गेले होते. यावेळी, सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांच्या कक्षात भोसले यांनी त्यांना अतिशय असभ्य भाषेत दमदाटी केली.
तसेच, घुले व नांगरे यांनी नेते घरी राहतील आणि तू देवाघरी जाशील, असे बोलून परत बाजार समितीत दिसलास तर हात पाय तोडून हातात देईन! पुणे बाजार समिती आमच्या बापाचीच आहे. जा तुला कुणाकडे जायचे तिथे! आम्ही कुणाला घाबरत नाय... असे बोलून दहशत निर्माण केल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
लवांडे यांच्या तक्रारीतील प्रमुख मागण्या
- सभापती, संचालकांसह 20 ते 25 गुंड प्रवृत्तीच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा
- मला आणि माझ्या परिवाराला धोका असल्यामुळे तत्काळ सशस्त्र पोलिस संरक्षण मिळावे
- 25 सप्टेंबर रोजीच्या बाजार समितीतील संपूर्ण दिवसाचे सीसीट्वीव्ही चित्रकरण जप्त करावे
- सत्यता तपासण्यासाठी सीसीट्वीही फुटेजचे सायबर एक्स्पर्ट मार्फत विश्लेषण करण्यात यावे
- फिर्यादिनुसार गुन्हा दाखल करून याप्रकरणाचा रितसर तपास होऊन दोषींवर योग्य ती कार्यवाही व्हावी