

बारामती: बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती आवारामध्ये काही लोक नशा करतात, धारदार शस्त्रे घेऊन बसतात, अशा लोकांवर कडक कारवाई करून त्यांना मकोका लावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना दिली.
समितीमधील गैरप्रकाराबाबत माझ्याकडे एक पत्र आले आहे. काही वेडेवाकडे केले तर मी आतमध्ये टाकायला सांगेन, हयगय करणार नाही, या शब्दांत त्यांनी समितीच्या संचालक, अधिका-यांना खडे बोल सुनावले. (Latest Pune News)
समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पवार यांनी समितीच्या संचालकांसह अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. पवार म्हणाले, मी अनेक काम करतो, कारण तुम्ही मला साथ देता. येणाऱ्या काळात नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. मी आत्तापर्यंत प्रचंड निधी बारामतीत आणला आहे. मला अनेक कामे करायची आहेत, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत माझे लोक निवडून द्या तरच माझ्या हातात संस्था राहतील.
काही जण जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, पण जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी जातीयवाद करणार नाही. शाहू -फुले- आंबेडकरांच्या विचाराने आपण पुढे चाललो आहोत. माझ्यानंतर एकही आमदार सकाळी सहा वाजता उठून काम करणार नाही, असे ते म्हणाले.
अलिकडील काळात मोबाईल गेममुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. बीडला एक महिला माझ्याकडे आली होती, माझे पैसे गेले असे म्हणत होती. माहिती घेतली तर त्या महिलेने त्या पोराला फोन दिला आणि ते गेम खेळताना पैसे गेले. आता ती महिला दादा पैसे काढून द्या म्हणते आहे. त्यामुळे कोणत्याही आई-बापाने लाडालाडात मुला-मुलींना फोन देऊ नका, असे पवार म्हणाले.
उधारीवरून पवार भडकले
बाजार समितीच्या पेट्रोल पंपाच्या उधारीवरून पवार यांनी पदाधिकारी-अधिका-यांना धारेवर धरले. दीड कोटींची उधारी झाल्यामुळे पवार यांनी संताप व्यक्त केला. बाजार समिती बापाची आहे का ? असा सवाल त्यांनी केला.
उपविभागीय पोलिस अधिका-यांना ते म्हणाले, हे काम तुमचे नाही पण जी वसुली राहिली आहे, त्याना फोन करून उधारी द्यायला सांगा, नाही तर वेगळ्या पद्धतीने भुंगा मागे लागेल हे लक्षात घ्या. तक्रारींचा पाढा असलेले पत्र पवार यांना या वेळी देण्यात आले. त्यावर पवार यांनी स्वीय सहाय्यकाला हे पत्र तुझ्याकडे ठेव. 5 तारखेला या सगळ्यांना बोलावून घे, मी करोडोंचा निधी आणतोय आणि तुम्ही असे करता, असे म्हणत नाराजी व्यक्त केली.