सासवड: श्रीक्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करा. जिथे स्थानिक अथवा प्रशासकीय अडचणी असतील तिथे संबंधित यंत्रणांची मदत घेतली जाईल. मात्र, तातडीने कामे पूर्ण करा; जेणेकरून दुसर्या व तिसर्या टप्प्यातील कामांसाठी राज्य शासनाकडून निधी मागणी करता येईल, असे निर्देश आमदार विजय शिवतारे यांनी पुरातत्व विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला सोमवारी (दि. 1) दिले.
सासवड (ता. पुरंदर) येथे प्रशासकीय इमारतीत जेजुरीगड तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांची आढावा बैठक आमदार विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत पार पडली, त्या वेळी शिवतारे बोलत होते. (Latest Pune News)
या वेळी तहसीलदार विक्रम राजपूत, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वहाने, देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंगेश घोणे, जेजुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता ओंकार रेलेकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरिभाऊ लोळे, अतुल म्हस्के, सचिन भोंगळे, देवस्थानचे विश्वस्त अनिल सौंदडे, विश्वास पानसे, देवस्थानचे कार्यकारी अधिकारी आशिष बाठे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
या वेळी कडेपठार, खंडोबा मंदिर, लवथळेश्वर, बल्लाळेश्वर आणि गौतमेश्वर मंदिर परिसरातील कामांचा आढावा घेण्यात आला. शहरातील महाद्वार रस्ता दगडी पद्धतीने करण्याबाबत सूचना देण्यात आली.
गडावरील दीपमाळा भाविकांनी अथवा व्यापार्यांनी बांधलेल्या दोर्या किंवा खिळे ठोकल्याने कमकुवत झाल्या आहेत. याबाबत सक्त सूचना संबंधितांना द्याव्यात आणि आवश्यकता भासल्यास पोलिसांचे सहकार्य घ्यावे, अशी सूचना शिवतारे यांनी केली. टप्पा 2 व 3 मधील निधीची लवकरात लवकर मागणी करणार आहे. त्यासाठी सध्या चालू असलेली कामे तातडीने पूर्ण करावीत, असे शिवतारे यांनी सांगितले.
529 कोटींचा निधी
मार्तंड देवस्थान विकासासाठी 349, जेजुरी पाणीपुरवठा योजनेसाठी 78, भूमिगत गटार योजनेसाठी 82, रस्ते विकास कामांसाठी 5.60, भक्तनिवासासाठी 5, पार्किंगसाठी 1, पाणीपुरवठा दुरुस्तीकरिता 7.60 कोटी अशा प्रकारे एकूण 529 कोटींचा निधी जेजुरीच्या सर्वांगीण विकासासाठी आणण्यात आला आहे. गटार योजना लवकरच मार्गी लावण्यात येईल. जेजुरी नगरपरिषदेत सत्ता मिळाल्यास केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्यातून जेजुरीचा विकास अधिक वेगाने, नियोजनबद्ध आणि सर्वसमावेशक पद्धतीने करता येईल, असे शिवतारे म्हणाले