मांडवगण फराटा: शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील तरुण शेतकरी वर्गाने यंदा पारंपरिक शेतीपासून फुलशेतीकडे वळत झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे; मात्र, गणेशोत्सव सुरू असूनही झेंडूला समाधानकारक दर न मिळाल्याने शेतकर्यांमध्ये निराशा पसरली आहे.
शेवंती आणि गुलछडी या फुलांच्या तुलनेत झेंडूच्या फुलांना बाजारात चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात झेंडूला सणासुदीच्या काळातदेखील फक्त 40 ते 80 रुपये प्रति किलो इतकाच दर शेतकर्याला मिळत आहे. यातून उत्पादन खर्चदेखील भागत नाही, असे नागरगाव येथील शेतकरी तेजस शेलार यांनी सांगितले. (Latest Pune News)
शिरूर तालुक्यातील नागरगाव, मांडवगण फराटा, तांदळी, कुरूळी, शिरसगाव काटा, इनामगाव, पिंपळसुटी या गावांतील अनेक शेतकर्यांनी यंदा झेंडूच्या फुलांची लागवड केली. सुदैवाने फुलांवर रोगराईचा प्रादुर्भाव नसल्याने उत्पादन भरघोस झाले; परंतु बाजारभाव कमी असल्याने आर्थिक नुकसान होत आहे.
दर घसरणीचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे बाजारात मोठ्या प्रमाणावर आलेल्या प्लास्टिकचे हार व फुले आहेत. अनेक तरुण शेतकर्यांमध्ये शेतीच्या भविष्यासंदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. शेती करायची पण योग्य बाजारभाव मिळणार नसेल तर करायची कशाला असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गणेशोत्सवात पारंपरिक फुलांना मागणी असतेच, पण यंदा ग्राहक प्लास्टिकच्या फुलांकडे अधिक वळले आहेत. ते स्वस्त, टिकाऊ आणि रंगबेरंगी असल्याने सामान्य ग्राहक त्याला प्राधान्य देत आहे.
- बंडू जठार, फूल व्यापारी, मांडवगण फराटा
आम्ही यंदा फुलबागा भरघोस केल्या आहेत. सुरुवातीला चांगल्या बाजारभावाची आशा होती. मात्र सध्या पुरवठा अधिक आणि मागणी कमी असल्याने दर घसरले आहेत. मेहनतीचे चीज होत नाही.
- तेजस शेलार, फूल उत्पादक शेतकरी, नागरगाव