

टाकळी भीमा: यंदा आठ वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे आपल्या गण, गटातील जनसंपर्क वाढवून तो मजबूत करण्यासाठी इच्छुकांमध्ये चढाओढ लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवाला आपसूकच राजकीय झालर लागल्याचे दिसून येत आहे.
गणेशोत्सवानिमित्त ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण आहे. अशा वातावरणामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, तालुक्यातील 96 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. लोकसभा, विधानसभेसारखीच चुरस या निवडणुकीमध्ये असल्याने प्रत्येक गावोगावी मत परिवर्तनासाठी स्थानिक नेते मंडळींचे जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. (Latest Pune News)
शिरूर तालुक्यातील 7 जिल्हा परिषद गट, 14 पंचायत समित्या, 96 ग्रामपंचायती यांच्या निवडणुकीसाठी किमान 350 ते 400 हून अधिक इच्छुक आहेत. त्यांचे कार्यकर्ते निवडणुकीच्या कामाला लागल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे. अशातच गणेशोत्सवानिमित्त बाहेरगावी राहणारी मंडळी गावाकडे आलेली आहे. त्यामुळे त्यांच्या भेटीगाठी घेऊन नेतेमंडळी येणार्या निवडणुकीची मोर्चेबांधणी करीत आहे.
गणेशोत्सवासाठी प्रत्येक मंडळाच्या आरतीला हजेरी लावून त्यांना वर्गणी देणे, मंडळाच्या कार्यकर्त्यांची विचारपूस करणे, वाढदिवस साजरे करणे, जेवणाची पंगत देणे यासाठी इच्छुकांमध्ये स्पर्धा लागल्याचे दिसून येत आहे. या स्पर्धेचा लाभ अनेक गणेश मंडळांनी घेतला आहे. गणेश मंडळांच्या भेटीगाठी सर्वच पक्षातील उमेदवारांकडून सुरू आहेत.
संपर्कासाठी गणेशोत्सव नामी संधी
येत्या एक दोन महिन्यात निवडणुकीचा धुराळा उडणार आहे. सर्व राजकीय पक्षांचे उमेदवार गुलदस्त्यात असले, तरी इच्छुक उमेदवारांची तयारी सुरू झाली आहे. सध्याच्या सण-उत्सवानंतर निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळे मतदारांशी संपर्क वाढवण्याची गणेशोत्सव ही नामी संधी राजकीय नेत्यांना वाटत आहे.