जेजुरी: पुरंदर तालुक्यातील नाझरे धरण जलाशयातील पाणीसाठा हा 92 टक्केपेक्षा अधिक झाला असून, कर्हा नदीपात्रातील पाणी धरणात प्रवाहित होत आहे. येत्या एक दोन दिवसांत धरण 100 टक्के भरणार असून त्यानंतर पाणलोट क्षेत्रातील पाऊस व पाण्याच्या येव्यानुसार धरणाच्या सांडव्यावरून स्वयंचलित द्वारांद्वारे कर्हा नदीत केव्हाही विसर्ग सुरू होऊ शकतो. धरण परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना नाझरे जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.
मे महिन्यात मान्सूनपूर्व पाऊस आणि जून महिन्यात मान्सूनचा पाऊस जोरदार झाल्याने नाझरे धरणात सध्या पाण्याचा येवा सुरू आहे. पाणलोट क्षेत्रातील पाण्याच्या येव्याचा दर पाहता पुढील 24 ते 48 तासांत प्रकल्पातील पाणीसाठा 100 टक्के होण्याचा अंदाज असल्याने नागरिकांनी कर्हा नदीपात्रात उतरू नये आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावीत. (Latest Pune News)
नदी किनार्यावरील सखल भागातील नागरिकांना सतर्कतेचां इशारा नाझरे धरण पूर नियंत्रण कक्ष तसेच नाझरे धरण शाखा अभियंता अनिल घोडके व विश्वास पवार यांनी दिला आहे. नाझरे धरणात मुबलक पाणीसाठा निर्माण झाल्याने धरणावर अवलंबून असणार्या पुरंदर व बारामती तालुक्यातील 56 गावांचा पिण्याच्या पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
इतिहासात प्रथमच जूनमध्ये धरण भरणार
नाझरे धरणाची पाणीसाठा क्षमता पाऊण टीएमसी असून मृतसाठा 200 दशलक्ष घनफूट आहे. पुरंदर तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान 496 मिलिमीटर असून मे व जून महिन्यात सरासरी पर्जन्यमान पातळी ओलांडली आहे. सध्या धरणात सुमारे 92 टक्के पाणीसाठा असून धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच जून महिन्यात धरण भरणार आहे