

पुणे: पुणे महापालिकेची यंत्रणा मुख्य विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयांपर्यंत विकेंद्रीत करण्यात आलेली आहे. पालिकेत काम करण्याची यंत्रणा जुन्या पध्दतीची आहे. क्षेत्रीय कार्यालयांना अनेक अधिकार असतांना नागरिकांच्या समस्या सुटत नसल्याने त्यांना त्यांच्या तक्रारी घेऊन मुख्यालयात यावे लागत आहे.
अशी कबुली महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली आहे. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासोबतच पालिकेची सिस्टीम पारदर्शक करण्यात येणार असून क्षेत्रीय कार्यालयाच्या कामकाजावर लक्ष ठेवणार असल्याची माहिती त्यांनी दिली. (Latest Pune News)
आयुक्त राम यांनी सोमवारी महापालिकेचे वेगवेगळे विभाग तसेच क्षेत्रीय कार्यालयांच्या कामांंचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधिंशी संवाद साधला. आयुक्त नवल किशोर राम म्हणाले, महापालिकेचा प्रशासकीय कारभार गतीमान होण्यासाठी आयुक्तांच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण करत परिमंडळ उपायुक्त व क्षेत्रीय कार्यालयांची जबाबदारी असलेल्या पालिका सहायक आयुक्त यांना नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अनेक अधिकार देण्यात आले आहेत.
असे असतांना त्यांच्याकडून कामात कुचराई केली जाते. यामुळे मुख्य खात्यांकडे नागरिक मोठ्या प्रमाणात तक्रारी घेऊन येत आहेत. हे टाळण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांच्या कामाकाजाला गती फेरबदल करत अधिकार्यांची जबाबदारी निश्चित करून गरज पडल्यास त्यांच्यावर कडक कारवाई होणार आहे.
दोन आठवड्यांत तीन हजार तक्रारी
महापालिकेचा पदभार स्वीकारल्यानंतरच्या पहिल्या दोन आठवड्यात सुमारे तीन हजार तक्रारी प्राप्त झाल्याचा खुलासा आयुक्त राम यांनी केला. या तक्रारी साध्या स्वरुपाच्या आणि लगेच सोडवता येण्यासारख्या होत्या. मात्र, क्षेत्रीय कार्यालये व विभाग प्रमुखांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांनी त्यांच्याकडे धाव घेतल्याचे त्यांनी नमूद केले. यानंतर तातडीने उपाययोजना करून नागरिकांच्या तक्रारी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले.
कर्मचारी भरपूर; पण रस्त्यावर दिसत नाही
शहर स्वच्छ ठेवण्यासाठी 12 हजार कर्मचारी काम करत आहेत. मात्र प्रत्यक्षात यातील अनेक कर्मचारी रस्त्यावर कधीच दिसत नाहीत. प्रत्येक पाचशे मीटर अंतरावर कर्मचारी काम करताना दिसणे अपेक्षित आहे. मात्र, तसे होत नाही.
शहरातील कचरा गोळा करण्याचे काम स्वच्छ संस्थेमार्फत केले जाते. यासाठी तीन हजार कर्मचारी आहेत. पैसे मिळत नसल्याने झोपडपट्टी भागातील कचरा उचलला जात नाही. त्यामुळे रस्त्यावर कचर्याचे ढीग साचतात. महापालिका यंत्रणा कुठे कमी पडते, याचा अभ्यास करणार असे आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.
महापालिकेचे कामकाज ऑनलाईन करणार
महापालिकेची काम करण्याची यंत्रणा जुनी आहे. सध्या ती बदलण्याची गरज आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर करुन सर्व विभाग एकमेकांशी जोडण्याचा प्रयत्न आहे. महापालिकेच्या कारभारात सुसुत्रता या माध्यमातून येईल. तसेच हे कर्मचारी काम करत नाही अशांचा शोध देखील घेता येईल, असे आयुक्त नवल किशोर राम म्हणाले.