Vidyanand Bapat Santosh Chavan Pudhari
पुणे

Vidyanand Bapat Attack: विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणारा संतोष चव्हाण कोण? काय काम करतो? हल्ल्यानंतर काय म्हणाला?

Vidyanand Bapat Attack in Pune: गणेशोत्सवातील ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावर भूमिका मांडणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर पुण्यातील टिळक रोड परिसरात हल्ला करण्यात आला.

Rahul Shelke

Vidyanand Bapat Attack in Pune Santosh Chavan Arrested: पुण्यात गणेशोत्सवाच्या काळातील ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादाला आता हिंसक वळण लागले आहे. ध्वनीप्रदूषणाविरोधात भूमिका मांडणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर आज टिळक रोड परिसरात एका व्यक्तीने हल्ला केला. बापट हे प्रसारमाध्यमांशी बोलत असताना संबंधित व्यक्तीने त्यांच्या कानाखाली मारली.

संतोष चव्हाण कोण आहे? (Who is Santosh Chavan)

या प्रकरणात पोलिसांनी संतोष चव्हाण याला अटक केली आहे. तो पुण्यातील कोथरूड परिसरातील राऊतवाडी येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच तो एका बांधकाम व्यावसायिकाकडे काम करत असल्याचे सांगितले जात आहे. राऊतवाडी येथील प्रियदर्शनी गणेश मंडळाचा तो माजी अध्यक्ष असल्याचीही माहिती समोर आली आहे.

हल्ला केल्यानंतर संतोष चव्हाण काय म्हणाला?

हल्ल्यानंतर संतोष चव्हाण याने प्रसारमाध्यमांशी थोडक्यात संवाद साधला. विद्यानंद बापट गणेशोत्सव आणि डीजेबाबत टीका करत असल्याच्या रागातून आपण हे कृत्य केल्याचे त्याच्या वक्तव्यावरून दिसून आले.

“तो (विद्यानंद बापट) टीका करतो, त्याला आणखी मारायलं पाहिजे. त्याला सुट्टी देणार नाही, त्याला आणखी मारणार आहे,” असे चव्हाण म्हणाला. पुण्यातील गणेशोत्सवाबाबत कोणी बोलले तर त्याला अशाच प्रकारे कानाखाली मारणार असल्याचेही त्याने म्हटले.

पोलिसांनी काय सांगितले?

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यानंतर हल्लेखोराची ओळख पटवून त्याला ताब्यात घेण्यात आले.

पुणे पोलिसांचे डीसीपी कृषीकेश रावळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीने नेमक्या कोणत्या कारणातून हा हल्ला केला, तसेच त्याचा उद्देश काय होता, याचा तपास केला जात आहे. बापट यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली असून, त्यांच्या तक्रारीनुसार पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले. बापट यांना सुरक्षा देण्याची आवश्यकता आहे का, याबाबतही परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हल्ल्यानंतर विद्यानंद बापट संतापले

हल्ल्यानंतर विद्यानंद बापट यांनीही माध्यमांशी संवाद साधला. आपण प्रसारमाध्यमांशी बोलत असताना अचानक एका व्यक्तीने हल्ला केल्याचे त्यांनी सांगितले.

बापट यांच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोराने पोलिसांची उपस्थिती नसल्याचा फायदा घेत त्यांच्यावर हल्ला केला. हा प्रकार प्रसिद्धीसाठी करण्यात आला असल्याचा आरोपही त्यांनी केला. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असून, पोलिसांनी ते तपासून योग्य कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, “मुद्द्याचे उत्तर गुद्द्याने द्यायचे नसते,” असे सांगत बापट यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

ध्वनीप्रदूषणाबाबत बापटांची नेमकी भूमिका काय?

गणेशोत्सव साजरा करण्याला आपला विरोध नसल्याचे विद्यानंद बापट यांनी स्पष्ट केले. मात्र सार्वजनिक ठिकाणी उत्सव साजरा करताना ध्वनीप्रदूषण होऊ नये आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, एवढीच आपली भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

गणेशोत्सव, डीजे आणि ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावरून पुण्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चा आणि वाद सुरू आहेत. त्यातच बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT