पुणे : जुन्नर, नारायणगावासह पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात 'शून्य सर्पदंश मृत्यूदर प्रकल्प' राबवून नारायणगाव येथील डॉ. सदानंद राऊत आणि डॉ. पल्लवी राऊत यांनी लोकांमध्ये सर्पदंशाबाबत जनजागृती करण्यासह परिसरात सर्पदंशापश्चात किडनी फेल्युअर आणि अपंगत्व यांच्या प्रमाणात ७० टक्के घट झाली. या प्रकल्पावर आधारित 'व्हेनोम वॉरिअर्स' या माहितीपटाला पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय आरोग्य चित्रपट महोत्सवात प्रथम पारितोषिक मिळाले.
पुण्यातील पीएम शाह फाउंडेशन व वर्धमान प्रतिष्ठानच्या वतीने लॉ कॉलेज रोडवरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात नुकताच दोनदिवसीय राष्ट्रीय आरोग्य चित्रपट महोत्सव पार पडला. या महोत्सवाचे उद्घाटन कर्करोगाच्या उपचारात क्रांती घडवून आणणारे पद्मश्री व मेगासेसे पुरस्कारविजेते डॉ. आर. कन्नन आसाम यांच्या हस्ते आणि अध्यक्ष चेतन गांधी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या महोत्सवांचे हे १४ वे वर्ष असून, यामध्ये मानसिक आरोग्य, मासिक पाळी, अवयवदान, रक्तदान, कर्करोग, ज्येष्ठांचे आरोग्य, महिलांचे लैंगिक शोषण आदी आरोग्यविषयक समस्यांवर चित्रपट दाखविण्यात आले. दि. १२ आणि १३ डिसेंबर या दोन दिवसांत पार पडलेल्या या महोत्सवात देश-विदेशांतून आलेल्या १५०हून अधिक लघुपट माहितीपटातून निवडलेले ३१ चित्रपट प्रदर्शित करण्यात आले. त्यातील नारायणगाव येथील डॉ. सदानंद व डॉ. पल्लवी राऊत यांच्या शून्य सर्पदंश मृत्यूवर प्रकल्पावर आधारित व्हेनोम वॉरिअर्स या माहितीपटास प्रथम क्रमांक मिळाला.
घोणससारख्या विषारी सर्पदशांत उपचारासाठी 'गोल्डन अवर्स' खूप महत्त्वाचा असतो. मात्र, जुन्नर, नारायणगावसारख्या ग्रामीण भागात या विषारी सर्पदंशाचे प्रमाण लक्षणीय आहे. या सर्पदंशाच्या उपचारांबाबत नागरिकांमध्ये पुरेशी जागृती नसल्याने मृत्यूचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे १९९५ पासून आम्ही 'शून्य सर्पदंश मृत्यूदर प्रकल्प' राबवून मृत्यूदर घटवण्याबरोबरच सर्पदंशपश्चात होणारे किडनी फेल्युअर आणि अपंगत्वाचे प्रमाणही घटले. त्याच कार्याची दखल घेणारा हा माहितीपट सर्वांच्या पसंतीस उतरला, याचा आनंद आहे.डॉ. सदानंद राऊत, सर्पदंशतज्ज्ञ