वेल्हे: राजगड तालुक्यातील रुळे येथील डोंगरावरील काळुबाई धनगर वाड्यात पाण्याची गाडी जाण्यासाठी कच्च्या रस्त्यावरील दगड-गोटे काढत असताना धोंडिबा बाबूराव जानकर (वय ६५, रा. काळुबाई वाडा, रुळे) या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. १७) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. धोडींबा यांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचे मत गावकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
मयत धोंडिबा जानकर हे सकाळी ७ वाजता दूध घालण्यासाठी शेजारच्या आंबी (ता. हवेली) गावात गेले होते. तेथून ते साडेसात वाजण्याच्या सुमारास पायवाटेने काळुबाई वाडा रस्त्याकडे निघून गेले. काळुबाई वाडा व शेजारील भोपाळी धनगरवाड्यात गेल्या दोन महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई सुरू आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाने पाण्याची पिकअप गाडी सुरू केली आहे. दररोज एक हजार लिटर पाणी जीपगाडीने धनगरवाड्यात दिले जात आहे.
रस्ता खराब असल्याने जीपगाडीला धनगरवाड्यापर्यंत पोहचण्यासाठी अडचणी येत आहेत, तसेच दगड-गोट्यांमुळे हादरे बसून पाण्याची गळती होत आहे. त्यामुळे रस्त्यावरील दगड-गोटे काढण्यासाठी मयत धोंडिबा जानकर हे गेले होते. दगड-गोटे काढत असताना तीव्र उन्हाच्या झळा बसल्याने त्यांची दमछाक झाली. त्यामुळे पायवाटेने काळुबाई वाड्यातील घराकडे येत असताना ते रस्त्यावर कोसळले.
दुपारी ५ वाजण्याच्या सुमारास एका महिलेने पायवाटेवर पडलेले धोंडिबा यांना पाहिले. त्यानंतर आसपासच्या परिसरातील नागरिकांनी तेथे धाव घेतली. स्थानिक रहिवासी तानाजी मरगळे म्हणाले, तीव्र उन्हामुळे धोंडिबा जानकर यांच्या चेहरा, हाता-पायासह शरीराची कातडी लालबुंद झाली होती. शरीर कोरडे पडले होते. उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू होऊन बराच वेळ झाल्याने त्यांचे शरीर कडकडीत झाले होते.
प्रशासनाला दिली नाही माहिती
या बाबत स्थानिक पोलिस तसेच शासकीय आरोग्य विभाग व इतरांना माहिती देण्यात आली नाही. त्यांचा अंत्यविधी करण्यात आला. त्यामुळे प्रशासनाकडे याबाबत माहिती उपलब्ध नाही. वेल्हे येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत भोईट म्हणाले, जानकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात आणण्यात आला नाही.